पुणे, दि. 25 : राज्यातील कोविड रुग्णसंख्या कमी होत असल्याने टप्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यात येत आहे. पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्ण असलेले ऑक्सिजन बेड यांची संख्या लक्षात घेऊन पाच टप्प्यांत निर्बंध हटवण्यात येत आहे. दरम्यान येत्या आठवड्यात पुण्यात निर्बंध लागू राहणार आहेत. पुन्हा एकदा डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका बघता पुण्यात तूर्तास जे निबंध लागू आहेत ते पुढे लागू राहतील.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर पॉझिटिव्हिटी दरचा वाढताना दिसत आहे. त्यामुळे तो आणखी वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे तूर्तास जे निर्बंध लागू आहेत तेच पुढे लागू राहतील, असं वळसे पाटील यांनी सांगितलं. तसंच शाळा- कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद असतील, असंही त्यांनी सांगितलं. पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे ही पार पडली. यावेळी ते बोलत होते.
■ नवे नियम पुढीलप्रमाणे :
● शनिवारी रविवारी केवळ अत्यावश्यक सुविधा आणि हॉटेल्सची पार्सल सेवा सुरू राहणार
● पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील.
● रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे शनिवार आणि रविवारी फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवेसाठी रात्री 11 पर्यंत सुरू राहणार.
● विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केलं जाणार.
● नाट्यगृहे, चित्रपटगृह बंदच राहणार
● 5 जून 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवेतील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार.
● कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना ( बी – बियाणे , खते , उपकरणे आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालांची विक्री करणारे दुकाने, गाळे हे आठवड्यातील सातही दिवस सुरू राहतील.