देशाचे पहिले सीडीएस अर्थात सर्व सेनादलांचे प्रमुख बिपिन रावत यांचे निधन होऊन आज ९ महिने लोटल्यानंतर नव्या सीडीएसची घोषणा करण्यात आली असून लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आणि संपूर्ण जग या घटनेमुळे हळहळले. त्यानंतर सीडीएस या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी कुणावर सोपवायची यासंदर्भात विचारविमर्श सुरू होता. आता अनिल चौहान यांच्यावर हा विश्वास दाखविण्यात आला आहे.
लेफ्ट. जनरल चौहान हे ६१ वर्षांचे असून मे २०२१मध्ये पूर्व विभागाचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे लष्करी सल्लागार म्हणून ते सेवारत होते. ४० वर्षे त्यांनी लष्करात देशाची सेवा केली आहे. विशेष म्हणजे जम्मू काश्मीर तसेच ईशान्य भारतातील बंडखोरांना आळा घालण्याच्या ऑपरेशन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
प्रथमच एक निवृत्त लष्करी अधिकारी या पदासाठी निवडला गेला आहे. पण सरकारने यासंदर्भातील नियमात बदल करून चौहान यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. चौहान यांचा जन्म १८ मे १९६१मध्ये झाला. १९८१मध्ये ते लष्करात गोरखा रायफल्समध्ये दाखल झाले. खडकवासलाच्या नॅशनल डिफेन्स अकादमीचे ते विद्यार्थी आहेत. तसेच डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्येही त्यांचे पुढील प्रशिक्षण झालेले आहे.
परमविशिष्ट सेवा पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले असून उत्तम युद्ध सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडलनेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. बिपिन रावत यांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात झाला होता. त्यात १३ लोक मृत्युमुखी पडले होते. त्यात काही काळ जिवंत राहिलेले एअर फोर्सचे ग्रुप कॅप्टन नंतर मृत्युमुखी पडले होते.