आंबेगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंबेगाव तालुक्यातील सहा गावात ग्रंथालये सुरु करण्यात आली आहे. साहित्यदिप वाचन चळवळ यांनीसाठी पुढाकार घेतला होता.
साहित्यदीप वाचन चळवळीच्या वतीने प्रत्येकी ग्रंथालयाला १२५ पुस्तके आणि नवीन पुस्तकांचे कपाटे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आपटी, घोडेवाडी (बोरघर), फुलवडे, थुगाव, न्हावेड, अवसरी खुर्द अशा सहा गावात ग्रंथालये, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सुरू झाली आहेत. तसेच अजून चार गावात दोन दिवसात ग्रंथालये सुरु होणार आहेत.
कोरोनामुळे हे कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने व मर्यादित संख्येने गावपातळीवर पार पडले. पुस्तकांची आवड आणि प्रचंड वाचन म्हणून तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचा महासागर म्हटले जाते, म्हणूनच त्यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत ही ग्रंथालये सुरू करण्यात आली.
ग्रामीण भागात वाचन चळवळ रुजावी, गावातील युवक-युवती यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा उद्देश ग्रंथालये सुरु करण्यामागे, साहित्यदिप वाचन चळवळ यांनी व्यक्त केला आहे.
साहित्यदीप वाचन चळवळीचे पदाधिकारी जीएसटी उपायुक्त महेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वायाळ, उद्योजक विजय केंगले आणि डॉ. अमोल वाघमारे यांनी यापुढे ही गाव तेथे ग्रंथालय ही मोहीम सुरू ठेवण्याचा निर्धार केलेला आहे.
बालसाहित्य, कथा कादंबऱ्या, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, आत्मचरित्र अशा स्वरूपाची पुस्तके ग्रंथालये यांना दिली आहेत.
या ग्रंथालयेसाठी, कपाटे, पुस्तके यांच्यासाठी अनेक दानशूरांनी मदत केली आहे. “आम्हाला पैसे नको तर ज्याला जमेल त्याने आपल्याकडील सुव्यवस्थित जुनी किंवा नवीन पुस्तके दान करावी. वाचन संस्कृती रुजावी हे आपण सगळ्यांचे काम आहे त्यामुळे यात सर्वानी सहभाग घ्यावा” असे आवाहन साहित्यदिप वाचनचळवळ यांनी केले आहे.