कोळवाडी येथे साक्षरता वर्गाचे उद्घाटन
घोडेगाव : रोटरी क्लब पुणे, कोथरुड व आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र, घोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोळवाडी येथे नुकतेच, साक्षरता वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
आजही समाजात निरक्षरता मोठ्या प्रमाणात आहे. विशेषत आदिवासी महिलांमध्ये निरक्षरता अधिक प्रमाणात दिसून येते. साक्षरता ही विकासाची पूर्वअट आहे. या पार्शवभूमीवर गेली काही वर्षे रोटरी क्लब व आदिम संस्था आदिवासी भागात साक्षरता वर्गाचे आयोजन करत आहे.
आंबेगाव तालक्यातील कोळवाडी येथे झालेल्या साक्षरता वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ॲड.मंगल तळपे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना साक्षरता वर्गात, आदिवासींसाठी उपयुक्त कायद्यांची माहिती ही समजून घेतली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब कोथरूडचे उज्वल तावडे, सत्यजित चितळे, सुहास पटवर्धन, हेमचंद्र दाते इ. उपस्थित होते. या साक्षरता वर्गात एकूण २५ महिला साक्षरतेचे धडे घेणार आहे.
उपस्थित महिलांना पाटी, पुस्तक, पेन्सिल व वर्गाला फळा, खडू मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या साक्षरता वर्गात मूलभूत साक्षरतेबरोबरच आर्थिक साक्षरता, कायदा साक्षरता, आरोग्य साक्षरता याविषयी पण माहिती दिली जाईल असे कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना आदिम संस्थेचे बाळू काठे यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे संयोजन, उज्वला मते, सुनंदा डगळे, सुप्रिया मते यांनी केले होते.