Thursday, November 21, 2024
Homeजिल्हाकविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय विशेष प्रेरणा पुरस्कार...

कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय विशेष प्रेरणा पुरस्कार जाहीर

नाशिक : नाशिकच्या सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार आणि प्रेरणा पुरस्कार दिले जातात. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते समर्पित भावनेने काम करणाऱ्या विषयी सार्वजनिकरित्या कृतज्ञता व्यक्त करणे हा या पुरस्कारा मागील हेतू आहे. 

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यापूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. गेल आमवेट, डॉ. रूपाताई बोधी कुलकर्णी, उषा वाघ, शांता रानडे, मेहरुन्निसा दलवाई, डॉ. यशवंत सुमंत, डॉ. तस्नीम पटेल, सुकन्या मारोती, आमदार जीवा पांडू गावित, प्रा. सुनील कुमार लवटे, सुभाष वारे आदींना प्रदान करण्यात आला आहे. 

यावर्षीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार देशाच्या शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत आपल्या कारकीर्दीची शंभरी पार केलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. यंदा या पुरस्काराचे अठरावे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरुप रोख रुपये 21000, स्मृतिचिन्ह, मानपत्र, आणि शाल बुके असे आहे. 

दलित आदिवासी महिला व निराधारांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या दिवंगत अनिता पगारे (मरणोत्तर) आणि कामगारांचे अश्रू पुसण्यासाठी व आदिवासींच्या सर्वांगिण विकासासाठी स्वतःला वाहून घेणारे दिवंगत नानाजी शिंदे (मरणोत्तर) यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विशेष प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये 10000, स्मृतिचिन्ह, मानपत्र, आणि शाल बुके असे आहे. 

यावर्षीचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय काम करणारे व्ही. टी. जाधव, परिवर्तनाच्या चळवळीत नेहमीच सहभागी असणारे फादर व्हेन्सी डिमेलो, कष्ट करून मुलांना उच्चशिक्षित बनवणाऱ्या उमाताई दरोडे, कोरोना काळात गरीब व गरजू रुग्णांसाठी औषध, अन्नधान्याची नियमीत मदत करणारे राहत फाउंडेशन नाशिक, आणि आदिवासी भागातील मुलींना क्रीडा नैपुण्य बनवणारे विजय भोळे यांना जाहीर करण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र, आणि शाल बुके असे आहे. 

पुरस्कार वितरण समारंभ माजी सनदी अधिकारी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत हस्ते आणि ज्येष्ठ साहित्यिक माननीय उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी साडे पाच वाजता प. सा. नाट्यगृह शालिमार नाशिक येथे होणार आहे. 

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य क्रीडा, क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेस व समाज सेवकास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय विशेष प्रेरणा आणि प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करताना कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयास मनस्वी आनंद होत आहे. अशी माहिती वाचनालयाचे सचिव राजू नाईक, विश्वस्त राजू देसले यांनी दिली आहे. 


संबंधित लेख

लोकप्रिय