Friday, November 22, 2024
Homeकृषीकिसान सभेचे नांदगाव खंडेश्वर येथे दुधाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन

किसान सभेचे नांदगाव खंडेश्वर येथे दुधाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन

नांदगाव खंडेश्वर : –  अखिल भारतीय किसान सभेच्या  नेतृत्वाखाली नांदगाव खंडेश्वर येथील बहिरम टेकडी येथे दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्यभर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे आंदोलन तीव्र करण्याची हाक किसान सभाने दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

दुधाला प्रति लिटर किमान ३० रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, २६ जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला शेतकऱ्यांचा घात करणारा निर्णय तातडीने रद्द करा, जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा, आणि देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान ५० रुपये अनुदान द्या, या मागण्यांसाठी किसान सभाचे २० जुलैपासून राज्यात आंदोलन सुरू आहे. 

लॉकडाऊनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना दुधाला ३० ते ३५ रुपये दर मिळत होता. मात्र लॉकडाऊनमुळे दूध मागणी घटल्याने दुधाचे भाव १७ रुपयांपर्यंत खाली कोसळले. शेतकऱ्यांना अशा संकटात मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने प्रति दिन १० लाख लिटर दुध खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना या योजनेद्वारे किमान २५ रुपये दराची हमी देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र ही योजना केवळ सहकारी दूध संघांनाच लागू करण्यात आली. राज्यातील ७६ टक्के दूध संकलित करणाऱ्या खाजगी दूध कंपन्यांना यातून वगळण्यात आले. परिणामी सरकार प्रतिदिन १० लाख लिटर दूध खरेदी करू शकले नाही. शेतकऱ्यांना यामुळे पुरेसा दिलासा मिळाला नाही. योजना सुरू असतानाही दुधाचे खरेदी दर यामुळे १७ रुपयांपर्यंत खाली आले. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर आता दूध विकत घेण्याऐवजी किंवा कंपन्यांना अनुदान देण्याऐवजी सरळ शेतकऱ्यांना मदत करावी, प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे ही मागणी किसान सभेने केली आहे. 

यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सहसचिव श्याम शिंदे, तालुका सचिव दिलीप महाले, भास्कर कुंभारे, प्रभाकर सुने, अनिल मारोडकर, सुरेश हळदे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय