कारगिल विजय दिवस – शिवयोध्दा प्रतिष्ठाणचा उपक्रम
पिंपरी चिंचवड : रुपीनगर येथील शिवयोध्दा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष अमोल भालेकर यांच्यामार्फत २३ वा कारगिल विजय दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. डोक्यावर रूबाबदार फेटा आणि आपल्या कारकिर्दीत मिळवलेली पदके आपल्या गणवेशावर मिरवणाऱ्या सैनिकांची ढोलताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमस्थळी औक्षण करून, आतिषबाजीने सर्व वीरांचे स्वागत करण्यात आले. जणू काही युद्ध जिंकून आपले वीर आल्याचा उपस्थितांना भास होत होता. शिवप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमासं सुरुवात झाली. सैनिकी वाद्यांच्या सुरातील राष्ट्रगीताने या सैनिकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
सर्व सैनिकांना पुष्पगुच्छ आणि एक छोटीशी भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रत्यक्ष युद्ध लढलेल्या या सैनिकांचे अनुभव कथन. युद्धाच्या गोष्टी ऐकून उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहिला. सर्वच सत्कारमूर्तींनी आपले युद्धभूमीवरील अनुभव एवढ्या उत्स्फूर्तपणे मांडले की उपस्थित प्रत्येकाच्या अंगात वीरश्री संचारली होती. जणू काही आपण युद्धभूमीवरच उपस्थित आहोत असा भास झाला. कारगिल युद्धाव्यतिरिक्त इतर अनेक युद्ध लढलेले सैनिक याप्रसंगी उपस्थित होते. श्रीलंका युद्ध, पाकिस्तानसोबत झालेली इतर युद्ध, राष्ट्रपतींचे अंगरक्षक, गोवा मुक्ती आणि इतर अनेक कथा व अनुभव ऐकून श्रोते तृप्त झाले.
कॅप्टन बळीराम गोळे म्हणाले, आपल्याकडे खूप नेते आहेत, परंतु देशावर खरेच प्रेम करणारे आणि आमचा सत्कार करून आम्हाला निवृत्तीनंतर सुद्धा मान देणारे अमोलदादा हे एकमेव आहेत. आम्ही जरी सैन्यातून निवृत्त झालो असलो तरी मरेपर्यंत आम्ही देशसेवेत कार्यरत आहोत.
मरण तर प्रत्येकाला येणारच आहे, पण देशसेवा करताना आलेले वीरमरण केव्हाही चांगले. तिरंग्यात लपेटून घरी येण्यासारखे भाग्य दुसरे नाही. त्यामुळे तरुण पिढीने सैन्यभरतीसाठी जोमाने प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी लागेल ती मदत करण्याची आमची तयारी आहे, असेही बाळाराम उत्तेकर म्हणाले.
अमोल भालेकर म्हणाले, “खरंतर तुम्हा वीररत्नांचा सन्मान करावा एवढे मोठे आम्ही नाही. तुम्ही या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित राहून आमचा सन्मान वाढवला.तुमचे आम्हावर खूप उपकार आहेत, या ऋणातून उतराई होणे कधीच शक्य नाही. तरी आपणांस कुठल्याही प्रकारचे सहकार्य लागले, काहीही अडचण आली तरी अर्ध्या रात्री मी तुमच्यासाठी उभा राहील.” सुत्रसंचालन दर्पण येवले यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी केले.
– क्रांतिकुमार कडुलकर