Monday, May 20, 2024
HomeNews'काळ' मेकर लाइव्ह : आजच्या अतितंत्रयुगातील जीवनावर भाष्य करणारी कादंबरी

‘काळ’ मेकर लाइव्ह : आजच्या अतितंत्रयुगातील जीवनावर भाष्य करणारी कादंबरी

बाळासाहेब लबडे यांची नुकतीच प्रसिद्ध झालेली ” ‘काळ’ मेकर लाइव्ह” (१० एप्रिल २०२३, पद्मगंधा प्रकाशन, पुणे) ही कादंबरी अगदी वेगळ्या धाटणीची आहे. आजच्या उत्तराआधुनिक काळातील भासात्मक वास्तवाची क्रिटिक करणारी ही कादंबरी म्हणावी लागेल. म्हणूनच आजचे भ्रमाचे भयावह वास्तव समजावून घेण्यासाठी ही कादंबरी प्रत्येकाने वाचायलाच हवी अशी आहे.

या कादंबरीवर नंतर विस्ताराने लिहिणारच आहे. ही कादंबरी मी सध्या वाचत असल्याने, तूर्त यावर काही निरीक्षणे देत आहे.

तरुणसुलभ वयामध्ये उत्सुकता, उत्साह, काहीतरी नवीन करण्याची उर्मी, महत्त्वकांक्षाच्या प्रेरणा, ‘स्व’ मध्ये रमणारी वृत्ती, आणि अजून अशा बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या रूपात त्या त्या व्यक्तीमध्ये बहुतेकदा उपस्थित असतात (हे केवळ तरुणांमध्येच असते अशातला काही भाग नाही. आज मोठ्या प्रमाणात साठी उलटलेले लोक या अशा अँप्समध्ये अधिक गुंतलेले दिसतात. मोकळा वेळ कसा घालवावा या प्रश्नाच्या अनुषंगाने तरुणांइतकेच किंवा त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात हे साठोत्तरी लोक गुंतलेले आहेत). त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक माहोल यावरून या गोष्टी ठरत असतात आणि विकसितही होत असतात. जगण्याचे मूलभूत विशेषतः आर्थिक प्रश्न मिटल्यावर थोडाफार छंद म्हणून या अशा व्यक्ती काही प्रमाणात या गोष्टींकडे आकर्षित होत असतात असे साधारणपणे म्हणता येईल (अर्थात असे होईलच या बद्दलचीही काही खात्री देता येणार नाही).

म्हणजे उदाहरणार्थ गाणे, संगीत, अभिनय, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, या पारंपारिक कलावस्तुंच्या आकांक्षेबरोबरच जागतिकीकरणानंतर निर्माण झालेल्या या कलावस्तुंच्या विविध रूपांचे जबरदस्त आकर्षण अनेकांत असते. हळूहळू १९९० नंतर रेडिओ, टेलिव्हिजन या पारंपरिक समाज माध्यमांची नंतर अनेक नव्या समाजमाध्यमांनी जागा घेतली. गेल्या तीन-चार दशकांमधला हा इतिहास आपणाला परिचित आहे.

साठ सत्तरच्या दशकांत हिंदी सिनेमांमध्ये स्टार होण्याची स्वप्ने पाहणारे तरुण-तरुणी मुंबईला धाव घेत. हीच गोष्ट पुढे ८० च्या दशकात सुद्धा काही प्रमाणात सुरू होतीच (आजचे तिचे रूप हे बदलले आहे). यातील बहुतेककरून दोन ते तीन टक्के लोक या क्षेत्रात थोडेफार आपले पाय रोवून यशस्वी झाले असावेत (हे प्रमाण देखील जवळपास ‘नाहीच’ असे म्हणावे लागेल). जवळपास ९८ /९९ टक्के लोकांच्या पदरी अपयश असाच हा भाग होता. हिंदी फिल्म उद्योग नगरीत या करमणूकप्रधान इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी केवळ रूप, उत्तम प्रकृती आणि शरीर ठेवण, गाण्यासाठी उत्तम आवाज, त्याचे प्रशिक्षण, वाद्यवृंद वाजवण्याची (तबला, ड्रम, व्हायोलिन, सतार वगैरे) उत्तम क्षमता एवढ्याच गोष्टी यात अभिप्रेत नाहीत (पार्श्वगायन, वाद्यवृंदाची सोबत करण्यासाठी संगीतकाराबरोबर काम करण्याची संधी… अशा अनेक गोष्टी यात अनुस्यूत आहेत). यात एक मोठे राजकारण असते. त्यात त्या व्यक्तीला यशस्वी व्हावे लागते. बहुतेकदा 99% लोक यात अपयशी ठरतात. आज अनेक समाजामध्यमांच्या अतिविकसित आणि चलतीच्या काळात या गोष्टी असंख्य अतृप्त आत्म्यांसाठी उपकारक ठरत आहेत.

सदाअत हसन मंटोसारख्या महान लेखकाला देखील या क्षेत्रात स्वतःचे पाय रोवता आले नाहीत (यामध्ये काही प्रमाणात त्याचा हटके स्वभाव जबाबदार होता). तत्कालीन अशोककुमारसारख्या दादा मुनींचा आधार, प्रोत्साहन मिळाल्यामुळे आणि मंटो हा स्वतःच एक प्रतिभाशाली महान लेखक असल्यामुळे त्यांनी दिलेले योगदान हे अविस्मरणीय असेच असले तरीही, ते मर्यादित लोकांपर्यंतच पोहोचलेले आहे (अनेकांना मंटो हे नाव माहितही नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे). मंटो या क्षेत्रात फारसे रुजू शकले नाही. तो काळही (भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते) तसा भयंकर हालाखीचा होता.

मुद्दा असा आहे की, अशा आकर्षणाचा हा काळ तरुण-तरुणींच्या जीवनात येत असतो आणि बहुतेकदा हे स्वप्नरंजन स्वप्नरंजनच राहते. वर उल्लेख केलेल्या तत्कालीन काळातील अनेक तरुण युवक युवती आपण कोणीतरी देवानंद, दिलीपकुमार, शम्मी कपूर, शशी कपूर, राजकुमार, राजेंद्रकुमार, राजेश खन्ना, जितेंद्र, त्या काळातला ही मॅन- धर्मेंद्र, विश्वजीत, अलीकडच्या काळातला अमिताभ बच्चन, किंवा साधना, तनुजा, नूतन, शर्मिला टागोर, वहिदा रहमान, आशा पारेख, हेमा मालिनी, रेखा, माला सिन्हा असल्याच्या भास-भ्रमात राहतात. आपल्या आवडीच्या नायक नायिकेचा चित्रपट अनेकदा पाहून त्या चित्रपटातील गाणी म्हणत… कधीकधी या चित्रपटातील संवादही म्हणत हे युवक-युवती आरशासमोर भास आणि भ्रम म्हणून नक्कीच उभे रहाता होते असे म्हणता येईल. वर उल्लेखलेल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या काळात अशा प्रकारचा क्षण हा येऊन गेलेला असतो. याबद्दल काही शंका नाही. आपल्या आवडत्या नायक नायिकांसारखा पोशाख, हेअरस्टाईल करून आपल्या मित्र-मैत्रिणींना ते इम्प्रेस करत असावेत किंवा या लोकांबद्दल काही ना काही बोलत राहणे असा हा प्रकार प्रत्येक निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय संस्कृतीत सर्रास घडलेला आहे. १९७०-८० च्या दशकात बिनाका गीतमाला माहित नसणारा/नसणारी शाळा-महाविद्यालयातील युवक-युवती ही बावळट समजले-समजली जात होती. हे उदाहरण या सर्व गोष्टींचे कदाचित एक प्रातिनिधिक चिन्ह म्हणता येईल.

समाजामध्ये पसरलेल्या या वृत्तीचा फायदा वेगवेगळ्या पद्धतीने घेणाऱ्या जटील संस्था यावेळी उदयाला आल्या होत्या (त्या पूर्वीही वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात होत्याच. या आजही आहेत /असाव्यात). मुंबईसारख्या महानगरांमध्ये पसरणाऱ्या वेश्याव्यवसायाशी याचा जवळचा संबंध होता. संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगुबाई काठीयाडवाडी’ हा सिनेमा आणि सुधीर जाधव यांची ‘कमाठीपुरा’ (२०२०) ही कादंबरी या वास्तवाचे चित्रण करतात.

गेल्या ३० वर्षात स्क्रीन संस्कृतीचा विस्फोट झाला आहे. यात अनेक ॲप्स कार्यरत आहेत. हा होत असलेला सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय जटील बदल बाळासाहेब लबडे यांच्या ” ‘काळ’ मेकर लाइव्ह” या कादंबरीने नेमका पकडलेला आहे. या गोष्टी कितपत योग्य-अयोग्य, सकारात्मक-नकारात्मक, नैतिक-अनैतिक, आवश्यक-अनावश्यक महत्त्वाच्या आहेत/असाव्यात/ नसाव्यात हे प्रश्नही या कादंबरीच्या केंद्रस्थानी येत राहतात.

आपल्या देशातील जवळपास निम्मी जनता (बहुतेक मोठ्या प्रमाणात साक्षर, अर्ध-साक्षर) या करमणूक उद्योगात अडकलेली आहे. यातून एक आंतरराष्ट्रीय भासात्मक कल्पनाप्रणाली उदयाला आली आहे. यात प्रचंड संपत्तीची गुंतवणूक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या ॲप्सची एका दिवसाची उलाढाल ही साधारणपणे पाच ते दहा हजार कोटी रुपयापेक्षाही जास्त असावी. यात करमणूक, मिमिक्री, पैशाची गुंतवणूक, प्रवास टूर आखणाऱ्या विविध कंपन्या, जुगार, क्राईम, गुन्हेगारी, भासभ्रमाच्या आधारावर उभी असणारी नाती, फसवाफसवी अशा अनेक गोष्टी सर्रास सुरू आहेत. याबद्दल फारसे आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही.

संहितांचा विचार करता माध्यमे आणि समाजमाध्यमांच्या या चलतीच्या काळात दुय्यम दर्जाचे साहित्य मोठ्या प्रमाणात येत असल्याचे चित्र आहे. इथे ‘संहिता’ (Text) म्हणजे केवळ साहित्य नव्हे. उदाहरणासाठी- स्टार मेकर्स, जाहिरात, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअपसारख्या माध्यमातून प्रसारित होणारे मजकूर, शृंगार, फोटोग्राफ्स, चित्रफिती, रिल्स, भय, आक्रोश, द्रोह-विद्रोहाच्या संहिता, वैद्यकीय सल्ला वगैरे किंवा नृत्यावर आधारित असलेली एखादी ॲप ही देखील संहिताच असते. या संहिता आणि साहित्यावर नेमकेपणाने आणि गंभीर्याने भाष्य करणारे आजचे एक महत्त्वाचे समीक्षक आणि विचारवंत राहुल पुंगलिया यांनी या आजच्या ‘समाज माध्यमांच्या संहितांवर’ नेमके बोट ठेवले आहे. या अनुषंगाने त्यांनी केलेले निरीक्षण फार इंटरेस्टिंग आहे. ते म्हणतात, ‘आज फेसबुक, व्हाट्सअप व इतर समाज माध्यमांमधून देखील… कॉमनसेन्स, माणुसकी, परवडेल इतका चांगुलपणा, विविध अस्मिता, सततचे वेगवेगळ्या कारणांनी आलेले दुखरेपण, दुखावलेल्या भावना, अन्यायग्रस्तता, सर्वांचे क्षेमकुशल असावे अशा सदिच्छा, भयग्रस्तता इत्यादी सहज उपलब्ध भावनिक पदार्थ हा या साहित्याचा (म्हणजेच संहितांचा) आशय असतो (वर्णमुद्रा, जानेवारी-फेब्रुवारी २०२३, पृ.६१).

लोकप्रिय चित्रपटातील गाणी, संगीत, वाद्यसंगीत, अशा विविध संहितांचा अवकाश उपलब्ध करून देणाऱ्या एका ॲपवर अवलंबून असलेली ही कादंबरी पुंगलिया म्हणतात तोच नेमका आशय पकडण्यात यशस्वी झाली आहे.

– दीपक बोरगावे, पुणे
(लेखक हे कवी, समीक्षक असून ‘गुजरात फाईल्स’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे.)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय