जुन्नर / नवनाथ मोरे : सिटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेने शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रस्ता रोको करत सरकारचा निषेध केला. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस गेल्या ४ डिसेंबर पासून संपावर गेल्या आहेत. परंतु सरकार मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज दुसऱ्या दिवशीही अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको केला.
जुन्नर शहरातील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. शिंदे, अजित पवार, फडणवीस सरकार होश मे आयो, मानधन नको वेतन हवे, पोषण आहार दर्जा सुधारला पाहिजे, अशा घोषणा देऊन एक तासभर परिसर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आवाजाने दुमदुमला. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे, किमान वेतन मिळाले पाहिजे, याकडे लक्ष वेधले.
त्यानंतर रॅली करत पंचायत समिती समोर गाणी गात शेवटी संजय साबळे यांचे जोरदार भाषणाने आंदोलनाचा समारोप झाला. जर महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन मागण्या सोडवल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी संघटनेच्या अध्यक्षा शुभांगी शेटे, सल्लागार जिल्हा लक्ष्मण जोशी, एस एफ आय चे राजेंद्र शेळके, किसान सभेचे पुणे जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे, युवक नेते संजय साबळे, सचिव मनीषा भोर, सुशीला तांबे, रुक्मिणी लांडे, जयश्री भागवत, कौशल्य बोऱ्हाडे, सीमा कुटे, गीता शेटे, मीना मस्करे, सविता ताजने, मीरा आरोटे, साधना मोजाड आदींसह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.