जुन्नर : तालुक्यातील आदिवासी भागातील गोरगरीब महिलांची कामाचे आमिष दाखवत फसवणूक करण्यात आली आहे. गेली कित्येक दिवस हाताला काम नसल्यामुळे रोजगाराच्या शोधात असणाऱ्या या महिला या आमिषाला बळी ठरल्या आहेत. रोजगार नसल्यामुळे गावात आलेल्या बोगस संस्था चालक यांनी नोंदणी शुल्क भरून नोंदणी करा तुम्हाला जनसेवा लघु उद्योग मार्फत काम मिळवून देतो असे खोटे सांगून नोंदणी शुल्क भरण्यासाठी भाग पाडले.
जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर भागात ( ता.१३ ) रोजी सकाळी दहाच्या सुमारास जनसेवा लघुउद्योग विकास ( महाराष्ट्र ) या संस्थेच्या नावाखाली दोन पुरुष आले होते. या चारचाकी वाहनातून आलेल्या पुरुषांनी बचत गटाच्या अध्यक्ष सचिवांना भेटायचे म्हणून सांगितले त्यावेळी त्यांनी काही घरी जाऊन थेट स्थानिक महिलांना भेटून आम्ही जनसेवा लघुउद्योग विकास ( महाराष्ट्र ) या संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या पोषण आहाराचे काम करणार असून त्यासाठी आम्हाला धान्य व काही वस्तू पॅकेजिंग करून हव्या आहेत असे सांगण्यात आले. त्यासाठी अगोदर बचत गटाच्या अध्यक्ष सचिवांची नोंदणी करण्यासाठी सांगितले मात्र नंतर ते बोगस व्यक्ती सर्वच महिलांची नोंदणी करून घ्यायला लागले. तसेच नोंदणी शुल्क म्हणून तीनशे रुपये जमा करा अशी बतावणी केली. आधीच हाताला काम नसल्याने हताश झालेल्या स्थानिक असंख्य महिलांनी त्या बनावट व्यक्तींकडे हजारो रुपये जमा केली.
ग्रामस्थ उषा मुठे या एका समाज सेवी संस्थेसोबत काम करत असल्याने त्यांना त्या व्यक्तींची शंका यायला लागली त्यावेळी त्यांनी त्यांच्या वरिष्ठ व्यक्तींना संपर्क केला असता अशी कोणतीही संस्था काम करत नसल्याचे समोर आले. त्यावेळी त्या बोगस व्यक्तींना थांबून धरण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिथून पळ काढला.
या अगोदर देखील फसवणुकीच्या बातम्या :
ग्रामस्थ सचिन भौरले यांनी संस्थेची अधिक माहिती तपासण्यासाठी गुगलवर “जनसेवा लघु उद्योग विकास (महाराष्ट्र)” हे संस्थेचे नाव सर्च केल्यानंतर या संस्थेने या अगोदर काही महिलांची फसवणूक केल्याच्या बातम्या सर्च इंजिन मध्ये आल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी ओतूर पोलिसांना भ्रमण ध्वनी वरून संपूर्ण घटनेची माहिती दिली.
तालुक्यात याआधी देखील असे प्रकार झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तर फसवणूक झालेल्या पैकी अनेकांनी यावर गप्प राहणे पसंत केले आहे.
जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांना दररोज तीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास करून रोजगारासाठी बनकर फाटा या ठिकाणी जावे लागत असते. त्यामुळे गावातच रोजगार मिळेल या आशेने ग्रामीण भागातील असंख्य महिलांनी नोंदणी केली. मात्र नंतर आपली फसवणूक झालीची चर्चा गावात रंगली त्यावेळी अनेकांनी मनस्ताप व्यक्त केला.