आंबेगाव (पुणे) : शिवशंकर विद्यालय तळेघर येथे शिक्षकाची बदली रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. अखेर एसएफआय च्या पाठपुराव्यामुळे आंदोलनाला यश आले असून पी. टी. कदम यांची पुर्ननियुक्ती करण्यात आली आहे.
शिवशंकर विद्यालय तळेघर ता. आंबेगाव जि. पुणे येथील हायस्कूलमध्ये पी.टी. कदम हे ५ वी ते १० वी या वर्गांना इंग्रजी विषय शिकवत होते. विद्यार्थी व पालकांचे म्हणणे आहे की, ‘कदम हे इंग्रजी विषय योग्यरित्या शिकवत होते व विद्यार्थ्यांची प्रगती देखील चांगली झाली होती. विद्यार्थ्यांशी चांगलं नात या सरांचं होतं. शाळेचे वर्ग बंद होत असताना आम्ही आमची मुले या शाळेत ठेवली. त्यामुळे शाळा चालू राहिली होती. मात्र संस्था अचानक या शिक्षकाची बदली करत आहे. बदली रद्द करून कदम यांना येथेच पुन्हा नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालक करत होते’.
वेळोवेळी पाठपुरावा करून देखील संस्थेने कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आज विद्यार्थी व पालक धरणे आंदोलनास बसले होते. या दरम्यान संस्था प्रतिनिधी, मुख्याध्यापक, एसएफआय या विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी, सरपंच, विद्यार्थी व पालक अशी बैठक झाली होती. संस्थेने ३० डिसेंबर २०२० ला आम्ही विद्यार्थी व पालकांची मागणीचा विचार करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.
संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केल्यावर संस्थेने दिलेले लेखी आश्वसन पळाले व शिक्षकांची बदली रद्द करून दि.०१ जानेवारी २०२१ पासून पुनर्नियुक्ती केली आहे. शिक्षकांची बदली रद्द होऊन पुनर्नियुक्ती झाली असल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.