Friday, December 27, 2024
Homeग्रामीणजुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी

जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी

जुन्नर : जुन्नर येथील श्री शिवछत्रपती कॉलेज मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. 

यावेळी बोलताना प्राचार्य मंडलिक म्हणाले, सावित्रीबाई या ज्योतीरावांच्या विद्यार्थिनी, कवयत्री, शिक्षिका, मुख्यध्यापिका, नेता, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत असा त्यांचा जीवनाचा विकास झालेला आहे. सावित्रीबाई या उत्तम संघटक व प्रभावी वक्त्या देखील होत्या. पहिल्या भारतीय शिक्षिका होण्याचा मान त्यांना वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी मिळाला. त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पुण्यातील सखाराम परांजपे, केशव जोशी, भवाळकर यांनी मोलाचे सहकार्य केले . 

सावित्रीबाई यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा व वाचनालय सुरू केले. 1854 मध्ये सावित्रीबाईंनी ‘काव्यफुले’ नावाचा कवितासंग्रह प्रकाशित केला. याचवर्षी त्यांनी स्वतःच्या घरात प्रौढांसाठी रात्र शाळा सुरू केलीे. त्यांनी सहा पुस्तके सुद्धा लिहिलेली आहेत.

ओतूर व सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. ज्ञानार्जन, अध्यापन आणि ज्ञान प्रसाराचे कार्य सावित्रीबाईंनी अखंडपणे सुरू ठेवले होते.1897 मध्ये पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रुग्णांना मदतही केली. मुढव्याच्या महार वस्तीतील मुलाला पाठीवर घेऊन हडपसर येथील डॉक्टर यशवंत यांच्याकडे गेल्या. त्या आजारात तो बरा झाला. परंतु त्यांना दुर्देवाने आजाराचा संसर्ग झाला आणि 10 मार्च 1897 मध्ये सावित्रीबाईंचे निधन झाले. अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम, असे प्राचार्य मंडलिक म्हणाले.

या  कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी मंडळाचे प्रमुख प्रा. संतोष काळे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक,  शिक्षकेतर कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. विक्रम रसाळ यांनी केले, तर प्रा.डॉ.सुधीर जोशी यांनी आभार मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय