आंबेगाव : आदीम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव केंद्र, पुणे व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.) च्या वतीने घोडेगाव येथे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना आदिम संस्थेच्या अर्चना गवारी यांनी सांगितले की, ‘८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचा मुख्य उद्देश स्रियांचे प्रश्न जगापुढे यावेत व त्यावर चर्चा व्हावी, हा आहे. आज आम्ही या दिनानिमित्त आंबेगाव तालुक्यातील स्रियांच्या सोनोग्राफी संदर्भातील प्रश्न घेऊन लढा देऊ व घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन डॉक्टर सहित उपलब्ध व्हावी, यासाठी आम्ही संघर्ष करू असे प्रतिपादन अर्चना गवारी यांनी केले.
या कार्यक्रमात एसएफआयचे तालुका सचिव समीर गारे यांनी ‘वास्तव तुझ्या लग्नाचे’ ही त्यांची स्वलिखित कविता सादर केली.
यावेळी आदिम संस्थेचे अनिल सुपे, अर्चना गवारी, एसएफआयचे पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, समीर गारे, सुशीला भोकटे, महेश गाडेकर, डीवायएफआयचे गणेश काटळे, सागर पारधी, जालिंदर गाडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सुपे तर आभार प्रदर्शन गणेश काटळे यांनी केले.