जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील उंडेखडक गावाला ‘सुंदर ग्राम स्मार्ट ग्राम पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जि.प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरे आणि इतर मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी ह्यांच्या उपस्थितीमध्ये गावच्या प्रथम नागरिक गायत्री रावते यांनी हा पुरस्कार स्विकारला.
आदिवासी विभागात खडतरपणे नाविन्यपूर्ण अस काम करणारी ही ग्रामपंचायत सरपंच गायत्री रावते, निलेश रावते आणि येथील कार्यक्षम ग्रामसेवक गाडेकर यांच्या कष्टाने जिल्ह्यात नावलौकीक मिळवला.
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी नेहमीच ग्रामपंचायतच्या कामांना सहकार्य असणाऱ्या पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती येथील अधिकारी वर्ग आणि पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके आणि सभापती विशाल तांबे, भाऊ देवाडे यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
उंडेखडक गावाला पुरस्कार मिळाल्याबद्दल आदिवासी भागातील जनतेतून गावाचे स्वागत केले जात आहे. गावागावांत या पुरस्काराची चर्चा आता सुरू आहे.