जुन्नर (पुुणे) : ५० हजार रुपये रक्कमेची लाच मागितल्याप्रकरणी जुन्नरचा तलाठी सुधाकर रंगराव वावरे (वय. ४५ वर्षे) यासह एका व्यक्तीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
जुन्नर येथील बिल्डिंग मटेरियल सप्लायर सोयाब जैनुद्दीन शेख, (वय ३० रा . शुक्रवार पेठ) यांनी याबाबतची फिर्याद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणांत तक्रारदार यांचे बिल्डिंग मटेरिअल वाहतूक साठी वाहने आहेत. त्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी दरमहा ५० हजार रुपये रकमेची मागणी तलाठी वावरे याने केली होती. तक्रारदार आणि तलाठी सुधाकर वावरे यांच्यामध्ये खासगी इसम रजाक इनामदार यांनी मध्यस्थी करून लाच देण्याकरिता प्रोत्साहन दिले. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
संबंधित विभागाने या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यानुसार ला.प्र. वि. पुणे परिक्षेत्र चे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, ला.प्र.वि पुणे चे अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सुनिल बिले, सुनिल क्षीरसागर, पो.शिपाई किरण चिमटे, दिनेश माने, चालक माळी व लाचलुचपत प्रतिबंध विभागातील कर्मचारी यांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितले प्रकरणी तलाठी सुधाकर रंगराव वावरे व मध्यस्थी रजाक इनामदार यास गुरुवारी रात्री अटक केली.
सुधाकर रंगराव वावरे, (वय ४५ रा . कल्याण पेठ, जुन्नर) व खासगी व्यक्ती रजाक रहमान इनामदार (वय ४९, रा. पणसुंबापेठ, जुन्नर ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १ ९ ८८ चे कलम ७ ; १२ नुसार जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.
आरोपींना आज खेड सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.