पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : जागतिक भूक निर्देशांकात भारत १११व्या स्थानी आला असून त्यामुळे भारतातील कुपोषण, उपासमार, गरिबी, बेरोजगारी हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. देशात केवळ लाभाची जाहिरात दाखवली जाते. मात्र, प्रत्यक्षात जनतेला काही मिळत नाही, आजही दोन वेळेचं जेवण मिळत नाही, नागरिक उपाशी आहेत त्यांची भूक भागत नाही हे सरकारचे अपयश आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,कष्टकरी संघर्ष महासंघ, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन तर्फे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जागतिक भूक निर्देशांक अर्थात Global Hunger Index 2023 मध्ये १२५ देशांच्या यादीत भारत तब्बल १११व्या स्थानी आहे. भारतानं या निर्देशांकासाठी आवश्यक आकडेवारीमध्ये २८.७ मानांकन मिळवलं असून त्याआधारे भारतात उपासमारीची भीषण स्थिती आहे. आजही जनतेला दोन वेळेचं जेवण मिळत नाही, महागाई, बेरोजगारी वाढलेली आहे, बालके व माता यांचे कुपोषण भयानक आहे याकडे केंद्र व राज्य सरकार चे दुर्लक्ष आहे.
जागतिक भूक निर्देशांकात उपासमारीचे तीन घटक विचारात घेतले जातात. पहिलं म्हणजे अन्नाची अपुरी उपलब्धता, दुसरं म्हणजे मुलांच्या पोषण स्थितीतील कमतरता आणि तिसरं बालमृत्यूचं प्रमाण (५ वर्षांखालील मुलांचे मृत्यू). याबाबतची माहिती ‘संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संस्था’, ‘युनिसेफ’ व ‘जागतिक आरोग्य संघटना’ यांच्याकडून घेतली जाते. या माहितीच्या आणि निकषांच्या आधारे भुकेचे बहुआयामी पद्धतीने विश्लेषण करून, गुणांची वर्गवारी करून निर्देशांक ठरवला जातो. भारत सरकारने यावर लक्ष देऊन भुखमारी कमी करणे गरजेचे आहे मात्र तसे होत नाही.