Friday, November 22, 2024
Homeआंतरराष्ट्रीयइस्रायल - पॅलेस्टाईन घनघोर संघर्ष सुरूच, एका भारतीय महिलेचा मृत्यू

इस्रायल – पॅलेस्टाईन घनघोर संघर्ष सुरूच, एका भारतीय महिलेचा मृत्यू

तेल अव्हीव – इस्रायलने गाझा पट्टीतील एका 13 मजली इमारतीवर क्षेपणास्त्रे सोडली होती. हा हल्ला करण्यापूर्वी इस्रायलने ही इमारत रिकामी करण्याची सूचनाही केली होती. या इमारतीवर हल्ला केल्याचा बदला घेण्यासाठी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर मंगळवारी पुन्हा क्षेपणास्त्रे सोडली. ही क्षेपणास्त्रे इस्त्रायलच्या एश्केलोन भागावर आदळली असून इथे राहात असलेल्या एका भारतीय नर्सचा मृत्यू झाला आहे.

या महिलेचे नाव सौम्या असून ती केरळमधील इडुक्की जिल्ह्याची रहिवासी असल्याचं कळालं आहे. आपल्या पतीसोबत व्हिडीओ कॉलवरून बोलत असतानाच तिच्या इमारतीवर क्षेपणास्त्र आदळलं होतं. पतीशी बोलत असतानाच जोरात आवाज आला आणि सौम्याचा फोन बंद झाला होता. तिच्या नवऱ्याने इस्रायलमध्ये राहणाऱ्या आणि ओळखीच्या असलेल्या इतर केरळी लोकांशी संपर्क साधला असता त्याला हल्ल्याबद्दल कळाले.

2017 नंतरचा इस्रायल आणि हमासमधला हा सर्वात मोठा संघर्ष आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने हा वाद निवळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र तूर्तास या प्रयत्नांना यश आलेले दिसत नाहीये. नव्या वादाची सुरुवात ही महिनाभरापूर्वीपासून झाली आहे. जेरुसलेममधून पॅलेस्टीनी कुटुंबांना बाहेर हाकलण्याची धमकी दिली जात आहे. यावरून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात वाद सुरू आहे.

जेरुसलेममधील अरबबहुल भाग हा आमचा असल्याचं ज्यूंचे म्हणणे आहे. यामुळे या भागात सतत तणाव आहे. शुक्रवारी जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीजळ या वादाने पुन्हा तोंड वर काढले. यामुळे इस्रायली पोलिसांनी बळाचा वापर केला. अल अक्सा मशीद ही मुसलमानांसाठी पवित्र ठिकाण आहे, तर ज्यूंसाठी पवित्र ठिकाण असलेले माऊंट टेंपल हे या मशिदीला खेटून आहे.

अल अक्सा मशिदीमध्ये जाण्यास निर्बंध लादण्यात आल्याने मुसलमान नाराज आहेत. रमझानच्या महिन्यात घडत असलेल्या या घटनांमुळे हमास भडकली असून याचा बदला घेण्यासाठी सोमवारी त्यांनी इस्रायलवर क्षेपणास्त्रे सोडली होती. अल अक्सा मशिदीवर इस्रायलचे आक्रमण रोखण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे हमासचे म्हणणे आहे.

मंगळवारी रात्री काय घडले?

इस्रायलने गाझा पट्टीतील 13 मजली इमारतीवर क्षेपणास्त्रे सोडल्याने हमासने तल अवीव भागातील इमारतींवर क्षेपणास्त्रे सोडली. या हल्ल्यात 50 वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू झाल्याचं इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हमासने सोडलेलं एक क्षेपणास्त्र रिकाम्या बसवर आदळलं, मात्र यात एक लहान मुलगा आणि 2 महिला जखमी झाल्या आहेत.


संबंधित लेख

लोकप्रिय