जेरुसलेम:इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धाला 14 जानेवारी रोजी 100 दिवस पूर्ण झाले आहेत,तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला, पण आजही हे युद्ध अखंड सुरू आहे.
युद्धबंदीऐवजी इस्रायलने गाझावरील हल्ल्यांची मोहीम अधिक तीव्र केली आहे.
युद्धात मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 24,000 ओलांडली आहे. त्यापैकी 8000 लहान मुले,महिला मारले गेले, तर 16000 नागरिकांचा मृत्यू झाला. या सामान्य लोकांमध्येही 80 टक्के महिला आणि मुले आहेत. सुमारे 10 हजार लोक बेपत्ता आहेत.
इस्रायलचे सैन्य गाझामध्ये सातत्याने हल्ले करत हमासचे विविध तळ उद्ध्वस्त करत आहे. उत्तर गाझा मध्ये भीषण चकमकी सुरू असून हमास बंडखोर इस्रायल सैन्य काफ़िल्यावर हल्ले करून टॅन्कस उध्वस्त करत आहेत,उत्तर गाझा मधून रॉकेट्स हल्ले केले जात आहेत.
दरम्यान इस्रायलने गाझा मधील पॅलेस्टाईन विद्यापीठावर हवाई हल्ले करून उध्वस्त केल्यामुळे अमेरिका सह संपूर्ण जगभर इस्रायलची निंदा केली जात आहे.
गाझा शहरातील प्रत्येक बाजारपेठ,नाट्यगृह,संग्रहालय, ग्रंथालय आणि सर्व पवित्र स्थळे नष्ट करण्यात आली.सोशल मीडियावर हजारो लोक आपली व्यथा मांडत आहेत.लोकांची घरे उध्वस्त होण्यापेक्षा ओमारी मशिदीच्या विध्वंसाचे जास्त दुःख होते कारण ते जुन्या गाझाचे प्रतीक होते.
इस्रायलने हमासला मान्यता देण्यास नकार दिला आहे.तसेच स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्र निर्मितीला विरोध केला आहे, अमेरिका, युरोपियन युनियन, कॅनडा आणि जपानसारखे देश हमासला दहशतवादी संघटना मानतात. तर चीन, इजिप्त, इराण, नॉर्वे, कतार, ब्राझील, रशिया, तुर्की, सीरिया याला दहशतवादी संघटना मानत नाहीत.इस्रायल-पॅलेस्टिनी वाद हा जगातील सर्वात संवेदनशील मुद्दा आहे. हे युद्ध थांबवण्यातही जग अयशस्वी ठरले आहे. इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेल्या या युद्धावर जगभरातील देशांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. काही देश इस्रायलला पाठिंबा देत आहेत तर काही गाझा आणि पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ पाठिंबा देत आहेत.