Sunday, May 5, 2024
Homeजिल्हासिद्धटेकमध्ये नवीन टपाल कार्यालयाचे उद्घाटन, रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश

सिद्धटेकमध्ये नवीन टपाल कार्यालयाचे उद्घाटन, रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश

कर्जत, ता. ३ – तालुक्यातील सिद्धटेक येथे नवीन टपाल कार्यालय (पोस्ट ऑफिस) सुरु करण्यात आले असून अहमदनगर विभागाचे वरिष्ठ डाक अधिक्षक बी. नंदा आणि कर्जत उपविभागाचे उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन झाले. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी थेट दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला होता.

सिद्धटेक हे कर्जत तालुक्यातील एक प्रमुख गाव असून राज्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर या ठिकाणी आहे. दरवर्षी गणेशोत्सव आणि दरमहा चतुर्थीच्या वेळी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या अगदी जवळच्या सीमेवर असल्याने सिद्धटेक हे ठिकाण वेगाने विकसित होत आहे. यापूर्वी जलालपूर येथील टपाल कार्यालयामार्फत येथील कामकाज चालत होते, परंतु सिद्धटेकमध्ये टपालाची प्रभावी संपर्क यंत्रणा नव्हती. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सिद्धटेकमध्ये टपाल कार्यालय सुरु करण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुंबई विभागाचे मुख्य पोस्ट मोस्टर जनरल किशन कुमार यांनी आमदार रोहित पवार यांना पत्र पाठवून याबाबतची प्रक्रिया सुरु करत असल्याचे चार महिन्यांपूर्वी कळवले होते आणि त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण होऊन अखेर सिद्धटेकमध्ये नवीन टपाल कार्यालय सुरु झाले आहे. या कार्यालयाला ४१४४०३ हा पीन कोड देण्यात आला असून दर्शना लोटे यांच्याकडे प्रथम शाखा डाकपाल म्हणून तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.

नवीन टपाल कार्यालय सुरु झाल्यामुळे मनी ऑर्डर, श्री सिद्धीविनायकाचा प्रसाद पोस्टाने पाठवण्याची सोय, तिकीट विक्री, बचत खाते, आवर्ती ठेव खाती, एनएससी/केव्हीपी प्रमाणपत्रे, सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ खाते, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खाती, पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी/ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना खाते/प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना खाते आदी योजनांचा येथील ग्रामस्थांना फायदा घेता येणार आहे. सिद्धटेकमधील अधिकाधिक ग्रामस्थांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

कोट
‘‘टपाल कार्यालय हे ग्रामीण भागात संपर्काचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात टपाल कार्यालयानेही आपल्यात कालसुसंगत असे अनेक बदल केले आहेत. अनेक योजना आणि बँकिंग सुविधाही टपाल कार्यालयामार्फत पुरवल्या जातात. नवीन टपाल कार्यालयामुळे या सर्वांचा सिद्धटेक परिसरातील ग्रामस्थांना लाभ मिळेल. हे कार्यालय सुरु केल्याबद्दल केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनपासून आभार!’’

रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय