पिंपरी / क्रांतिकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवडसह सर्वत्र मॉल मार्ट होत असले तरी ते खिशाला परवडणारे नाही पथारी, हातगाडी, टपरीधारक अर्थात फेरीवाला हा अगदी रस्त्याकडेला जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरामध्ये पुरवत असल्यामुळे नागरिकांची बचत होत असून फेरीवाला हाच एक जनतेचा सेवक आहे असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे वाल्हेकरवाडी चिंचवड येथे महासंघाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी शाखा अध्यक्ष नंदा घुगे, उपाध्यक्ष अजय धनवटे, दिनेश गायकवाड, बाळासाहेब सातपुते, श्रीकांत मेहंते, अमोल घुगे, दिगंबर जाधव, सलीम डांगे, ओमप्रकाश मोरया आदी उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले की, आजच्या युगामध्ये मॉल आणि मार्ट संस्कृतीमध्ये वेगवेगळी अमिषे दिली जातात व नागरिकांना, ग्राहकांना फसवण्याचे काम सुरू असून दर्जाहीन वस्तूला अधिक दराने विकले जात आहेत. महागाई प्रचंड वाढलेली असताना फेरीवाल्याकडून अत्यंत स्वस्त दरामध्ये वस्तू उपलब्ध होत आहेत. महानगरपालिकेकडून मात्र त्यांच्याकडे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. पथ विक्रेता कायद्याची अंमलबजावणी केल्यास त्यांच्यावर कारवाई करून साहित्य जप्तीची वेळच येणार नाही. प्रास्ताविक अमोल घुगे यांनी केले तर आभार किरण साडेकर यांनी मानले.