नांदेड : आरोग्य अभियानाचा कणा असलेल्या राज्यातील आशा आणि गटप्रवर्तक १२ जानेवारी पासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकारच्या मंत्र्यांनी अशांना सात हजार आणि गटप्रवर्तक (सुपरवायझर) ताईंना दहा हजार दरमहा मानधन वाढीची घोषणा केली आहे.
परंतु अद्याप शासन आदेश काढण्यात आला नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सीटू च्या नेतृत्वाखाली मोर्चे आंदोलने सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने दि.१७ जानेवारी रोजी रीतसर प्रशासनास नोटीस देऊन महात्मा गांधी पुतळा येथून मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार आणि जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांच्या सहीने देण्यात आले आहे.
मोर्चा च्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात येणार असे नियोजन होते.
परंतु जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत जमाव बंदी आणि शस्त्र बंदी आदेश जारी केल्याने आंदोलने, उपोषणे व मोर्चावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे संघटनेने मोर्चा रद्द केला आणि जिल्हा ठरल्याप्रमाणे जिल्ह्याच्या कानकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने आलेल्या आशा नांदेड शहरात धडकल्या. त्यांना मोर्चा रद्द केल्याचे माहिती नव्हते. मग जिल्हा परिषदे समोर निदर्शने करून आरोग्य विभागाचे समन्वयक थोरात यांना निवेदन देण्यात आले. आणि पोलिसांनी केलेल्या सुचने प्रमाणे आंदोलन थांबविण्यात आले.