Friday, December 27, 2024
Homeग्रामीण"महाज्योती" योजना तात्काळ कार्यान्वित करा - ओबीसी विद्यार्थ्यांची मागणीसाठी ईमेल मोहीम.

“महाज्योती” योजना तात्काळ कार्यान्वित करा – ओबीसी विद्यार्थ्यांची मागणीसाठी ईमेल मोहीम.

(मुंबई) :- बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर आधारित भटक्या विमुक्त आणि ओबीसी समाजाच्या शिक्षणासाठी जाहीर झालेली महाज्योती ही योजना तात्काळ कार्यान्वित करण्याची मागणी ओबीसी विद्यार्थ्यांनी सरकारकडे ईमेल द्वारे केली आहे. 

       भटका-विमुक्त समाज हा वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेला समाज आहे. त्याचबरोबर इतर मागासवर्गीयांचे हीच स्थिती आहे. वरील समूह पैकी अनेक वर्ष जंगलामध्ये भटकत राहणारा समूह हा मागील काही वर्षांमध्ये हळूहळू स्थिर होत आहे. मात्र या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सातत्याने होणारे दुर्लक्ष आणि त्याचा परिणाम म्हणून   हा समाज आजही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. याचे कारण, समुदायातील लोकांची उपजीविका ही ऊसतोड कामगार, शेती कामगार, बांधकाम मजूर, शेतमजूर किंवा इतरांच्या शेतावर सालगडी म्हणून राहणे इ. अवलंबून असल्याने त्यांच्या दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्‍न सुटलेला नाही त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालण्याची मागणी ओबीसी विद्यार्थ्यांनी केली आहे.

     ही संस्था स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे आपण जर या संस्थेची पुढील कार्यवाही करत नसाल तर येणार्‍या काळात भटके-विमुक्त, इतर मागास वर्ग आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा सरकारला देण्यात आला आहे. 

     विविध मागण्यांना घेऊन बळीराम चव्हाण, इंदल जाधव, भारत चव्हाण, अंकुश राठोड, महादेव ढगे, विजय धनगर, कल्पना बडे, मनिषा शिंदे, शिल्पा चव्हाण यांनी पुढाकार घेऊन सरकारला ईमेल पाठवण्याची मोहीम सुरु केली आहे.

प्रमुख मागण्या : 

◆ भटके – विमुक्त, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांना महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात संशोधक छात्रवृत्ती कमीतकमी १५०० विद्यार्थ्यांना प्रती वर्षी देण्यात यावी.

◆ भटके विमुक्त, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या तिन्ही समुहांना सम पातळीवर स्वातंत्र्य जागा आरक्षीत ठेवाव्यात.

◆ या योजनेचे मुख्यालय औरंगाबाद या शहरात करण्यात यावे.

संबंधित लेख

लोकप्रिय