Wednesday, May 22, 2024
Homeविशेष लेखMalshej Ghat: सर्वांगीण प्रगतीचा महामार्ग 'माळशेज घाट' : सुवर्ण महोत्सवी वर्ष

Malshej Ghat: सर्वांगीण प्रगतीचा महामार्ग ‘माळशेज घाट’ : सुवर्ण महोत्सवी वर्ष

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस, खळखळत फेसाळणारे शुभ्र धबधबे, हिरव्यागार डोंगरांवर हळुवार सरकणारी दाट धुक्याची दुलई आणि त्यातून धोकादायक वळणे घेत बोगद्यात जाणारा रस्ता आणि जीव मुठीत धरून बसलेले प्रवासी हे सर्व ऐकले की नजरेसमोर दिसतो तो निसर्गाने निखळ सौंदर्याची मुक्त उधळण केलेला ‘माळशेज घाट.’ स्वर्गीय सुखाचा आनंद देणारा ‘माळशेज घाट’ (Malshej Ghat) पावसाळ्यात अधिकच धोकादायक आणि रौद्र रूप धारण करतो हे सुद्धा तितकेच खरे. आयुष्यत चुकीचा रस्ता भेटला तर हमखास वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते याचा अनुभव आपण सर्वांनाच आहे. पन्नास वर्षे मागे वळून पाहिले तर ‘अणे – माळशेज घाटरस्ता’ हा आपल्या सर्वांसाठी सर्वांगीण प्रगतीकडे नेणारा सर्वात जवळचा महामार्ग ठरला आहे.

होय… पन्नास वर्षे! माळशेज घाटाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. दिनांक २ मे १९७४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतराव नाईक, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत माळशेज घाट वाहतूकीसाठी खुला झाला होता. आणखी एक महिन्याने म्हणजे येणाऱ्या दिनांक २ मे २०२४ रोजी माळशेज घाट सुरू झाला या घटनेला बरोबर पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. एका अर्थाने हा माळशेज घाटाचा ५० वा वाढदिवस किंवा वर्धापन दिवस आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीचा किंवा संस्थेचा ५० वा वाढदिवस किंवा वर्धापन दिवस खूप अगोदरपासून जोरदार तयारीसह धुमधडाक्यात साजरा केला जातो. एखाद्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यास ‘सुवर्ण महोत्सव’ साजरा केला जातो. परंतु आपल्या सर्वांच्या आयुष्यात आणि जीवनशैलीत आमूलाग्र बदलाची नांदी ठरलेल्या माळशेज घाटाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत याचा आपल्या सर्वांनाच विसर पडला आहे असे वाटते.

माळशेज घाटाने (Malshej Ghat) आपल्याला काय दिले? या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात देणे अतिशय कठीण आहे किंबहुना, माळशेजने आपल्याला काय दिले नाही… सर्वकाही दिले, एवढे सोपे आहे. माळशेजच्या निर्मितीपूर्वी किंवा त्याअगोदर स्वातंत्र्यपूर्व काळात गावाहून मुंबईला येताना एखाद्या वाहनचालकाला विनवणी करत किंवा कधी कधी पायी प्रवास करत तळेगाव गाठायचे आणि रेल्वेने रात्री मुंबईला पोहचायचे. मुंबईहून गावी जाताना रेल्वेने तळेगावपर्यंत आणि तिथून पुढे एखादे वाहन मिळाले तर ठिक नाहीतर…पायी प्रवास करत रात्री उशिरा आपले गाव गाठायचे असा प्रवास जुन्नरकरांना किंवा इतरांनाही करावा लागायचा. या तत्कालीन मुंबई प्रवासाचे चित्र नजरेसमोर उभे राहिले तरी माळशेज घाटाने आपल्याला काय दिले याचे उत्तर आपोआप सापडेल. सुरूवातीला कच्च्या रस्त्याच्या स्वरूपात आपल्या सेवेत रुजू झालेल्या माळशेज घाटरस्त्याने हळूहळू डांबरी स्वरूप घेतले आणि तो निरनिराळ्या गावांना, अनेक मोठमोठ्या शहरांना राज्याच्या राजधानीशी जोडणारा ‘महामार्ग’ झाला. मोठमोठे खड्डे आणि धुळीचे साम्राज्य असलेल्या एकपदरी माळशेज घाट रस्त्याला हळूहळू अतिशय सुंदर आणि देखणं स्वरूप प्राप्त झाले आणि तो जगभरच्या पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

भूतलावरील स्वर्ग अशी ओळख असलेल्या माळशेजच्या सौंदर्यात मुरबाडचे आमदार किसनराव कथोरे यांनी अतिशय कल्पकतेने केलेल्या सुधारणांमुळे अधिकच भर पडली आहे. माळशेज घाट (Malshej Ghat) हा विलोभनीय निसर्ग, समृद्ध जैवविविधता, ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ यासाठी ओळखला जातो. निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी माळशेज घाट म्हणजे नंदनवन आहे. पावसाळ्यातील दरडी कोसळणे, अपघात किंवा कधीतरी घातपात यामुळे झालेली प्राणहानी अशा माळशेजच्या कटु आठवणी आहेतच ; परंतु घाटमाथ्यावरील अपघातांमुळे, हार्ट अटॅकमुळे किंवा तातडीची वैद्यकीय मदत आवश्यक असलेल्या इतर अनेक गंभीरप्रसंगात माळशेज घाटमार्गे वेळेत मुंबईत पोहचून वैद्यकीय मदत मिळाल्याने प्राण वाचलेल्यांची संख्या खूप अधिक आहे. कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, पर्यटन, वैद्यकीय, दळणवळण आदी विविध क्षेत्रातील आपल्या ‘सर्वांगीण प्रगतीचा महामार्ग’ असेच माळशेज घाटाचे वर्णन करावे लागेल.

पाच – सात वर्षांपूर्वीपर्यंत माळशेज घाटातील बोगद्याच्या अगोदर डाव्या बाजूला, ‘नामदार वसंतराव नाईक, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते दिनांक २ मे १९७४ रोजी उद्घाटन झाले’ असा पुसटसा नामफलक होता तो आता दिसत नाही. अनेक शालेय, सामाजिक, सांस्कृतिक संस्था, बॅंका, ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू, डेक्कन क्वीनसारख्या गाड्या यांचे सुवर्ण, अमृत किंवा शताब्दी महोत्सव साजरे होत असतात. मग अनेक गावे, शहरे, तालुके, जिल्हे माळशेज घाटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजधानीशी जोडलेल्या महत्वपूर्ण घटनेचा सुवर्ण महोत्सव साजरा व्हायला काय हरकत आहे. तुमच्या आमच्या जीवनात अतिशय सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण बदल घडविणाऱ्या माळशेज घाटाबद्दल सर्वांच्याच काही ना काही आठवणी असतील. या सुवर्ण महोत्सवानिमित्त आपण आपल्या चांगल्या आठवणी शब्दांकित करून माळशेजच्या एखाद्या फोटोसह ‘निसर्गरम्य जुन्नर भूमी गुणिजनांची’ या फेसबुक ग्रुपवर अवश्य शेअर करा.

– स्तंभलेखक संजय नलावडे, धोलवड
मोबाइल – ८४५१९८०९०२

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी घोषणा

मोठी बातमी : अरविंद केजरीवाल यांना दिल्‍ली उच्‍च न्यायालयाचा मोठा झटका

काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मोठी बातमी : महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, वाचा कोणत्या पक्षाला किती जागा !

भाजपच्या बड्या नेत्याने घेतली सलमान खानची भेट, राजकिय वर्तूळात जोरदार चर्चा

सीमा हैदरला पतीकडून जबर मारहाण ; डोळा काळानिळा, चेहरा सुजला ?

विरोधकांनी फक्त परिवाराचाच विकास केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुण्यात नोकरी शोधताय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

मोठी बातमी : अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक

भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय