सोलापूर, दि. ६ : पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते. पंढरपूर आषाढी वारी साठी संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी या टोल माफी सुविधेचा वारकऱ्यांना लाभ होण्यासाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले. त्याप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ निर्देश देण्याबाबतही त्यांनी सांगितले.
वारी मार्गावर पंढरपूर येथे स्वच्छता बाळगावी
आषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होत आहेत. पंढरपूरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण वारी मार्गावर व पंढरपूर शहरात चांगली स्वच्छता ठेवावी. कुठेही कचरा साचणार नाही याची दक्षता घ्यावी. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा. ते वेळोवेळी रिकामी होतील अशी व्यवस्था करा. वारी मार्गावर फिरते शौचालय तसेच पंढरपूर शहरात शौचालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये २४ तास ड्युटी लावून शौचालये स्वच्छ ठेवावीत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणे, सामुग्री उपलब्ध करून द्या, दैनंदिन साफसफाई यासाठी आजूबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा, असेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.