Sunday, May 19, 2024
Homeराज्यमहाराष्ट्रातील आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या; 'एसएफआय' ची आदिवासी विकास मंत्र्यांंकडे मागणी

महाराष्ट्रातील आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या; ‘एसएफआय’ ची आदिवासी विकास मंत्र्यांंकडे मागणी

मुंबई : महाराष्ट्रातील आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या, अशी मागणी स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने आदिवासी विकास मंत्र्यांंकडे ई-मेल निवेदनद्वारे करण्यात आली आहे

निवेदनात म्हटले आहे की, बदलत्या काळात शैक्षणिक क्षेत्रांतील सर्वच ज्ञानशाखांमध्ये संशोधनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. तसेच शासनाच्या नविन धोरणानुसार महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी प्राध्यापकांना पीएचडी अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रध्यापक होवू इच्छिणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना पीएचडी करणे गरजेचे आहे. परंतु आदिवासींच्या एकूण परिस्थीतीचा विचार करता अनेक विद्यार्थ्यांना संशोधन शिक्षण पूर्ण करणे शक्य होत नाही. संशोधन शिक्षणामध्ये आदिवासीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामध्ये पीएचडी अनिवार्य केल्यामुळे केवळ शिक्षण नाही तर एका प्रमुख व्यावसायिक क्षेत्रातून आदिवासी तरुणांना बाहेर फेकले जाईल ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. शासनाने सर्व प्रकारच्या नॉन नेट फेलोशिप बंद केल्या आहेत. त्यामुळे संशोधन शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना दुसरा काही आधार पण शिल्लक राहिलेला नसल्याचे म्हटले आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), नवी दिल्ली यांच्या धोरणानुसार अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येते त्याचा धागा पकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी), पुणे आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत ज्या त्या जाती समूहातील संशोधक विद्याथ्यांना फैलोशिप देण्यात येते. परंतु अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना अशा कोणत्याही प्रकारची फेलोशिप देण्यात येत नाही. 

सन २०१३ पासून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) , पुणे यांंनी स्वायत्ततेच्या दर्जा मिळवलेला आहे आणि आदिवासी समाजावर संशोधन करणे हे मुख्य उद्दिष्ट असून सुद्धा संशोधक विद्यार्थ्यांना वरील संस्थांप्रमाणे फेलोशिप सुरु केलेली नाही. म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या नियमानुसार नियमित आणि पूर्णवेळ पीएचडी व एमफिल करणारे महाराष्ट्रातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप सुरु करावी, अशी मागणी स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया ( SFI ) चे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ, कविता वरे यांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय