पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांत लम्पी प्रतिबंधासाठी 49.83 लाख लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या 5 किमी. परिघातील 1229 गावातील 19.55 लाख जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले असून व गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने जनावरे असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे.
शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रात सरसकट लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले.आयुक्त सिंह म्हणाले, लम्पी आजार केवळ जनावरांमध्ये आढळून येतो. देशातील आकडेवारीमुळे तसेच समाजमाध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे पशुपालकांनी अनावश्यक भीती न बाळगता आवश्यक खबरदारी घ्यावी.
लम्पीबाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास अथवा माहिती द्यायची असल्यास संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.1800-2330-418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 वर तात्काळ संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.