निगडी (पुणे) : सेक्टर २२ येथील वंचित लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतंर्गत मोफत घरे देण्याची मागणी निगडीचे शिवसेना शाखाप्रमुख अरुण जोगदंड यांनी आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जे. एन. यु. आर. एम अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन गृहप्रकल्प राबविण्यात आला होता. सदर गृहप्रकल्पात एकूण १४७ इमारतीमध्ये ११ हजार ७६० सदनिकेचा प्रस्ताव होता. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेवरून जुन्या इमारती पाडून तेथील नागरीकांना नवीन घराचे स्वप्न दाखवत हा प्रकल्प उभा करण्यास सुरुवात केली. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रेड झोनच्या हद्दीची माहीती न घेता राहत्या घरातून बेघर करत लोकांना आज खुरावड्यात राहण्यास भाग पाडले.
यातील काही इमारतीचे बांधकाम पुर्ण होऊन देखील अद्यापही काही लाभार्थांना घरापासून वंचित राहावे लागत आहे. यामध्ये सामान्य नागरीकांची कोणतीही चुक नसताना आज त्यांना असाहय्य त्रास सहन करावा लागत आहे. तरी देखील लाभार्थी प्रशासनाला अत्यंत संयमाने सहकार्य करत आहेत, परंतु आता नागरीकांचा संयम सुटला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी या प्रकल्पात सदनीका वाटप करणे न्यायालयीन आदेशामुळे शक्य नसेल तर महानगरपालिकेने पंतप्रधान योजने अंतर्गत या नागरीकांना विनाशर्त मोफत घर देण्यात यावे. तरी याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेवर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे.