Friday, November 22, 2024
Homeराज्यमुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा

मुंबई, दिनांक ७:  मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.

हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, बहृन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व महापालिकांचे आयुक्त, कोकण विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक, आपत्ती  व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकारी व इतर  मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय