Friday, November 22, 2024
Homeजुन्नरकुकडी व घोड प्रकल्पातून सुटणार १ मार्च रोजी आवर्तन

कुकडी व घोड प्रकल्पातून सुटणार १ मार्च रोजी आवर्तन

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

कर्जत, (ता. २४) : कर्जत मतदारसंघासाठी महत्त्वाच्या असलेल्या कुकडी प्रकल्पातून १ मार्च रोजी पाणी सोडण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. २४) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. याशिवाय घोड प्रकल्पातूनही १ मार्च रोजी पाणी सोडण्याचा आणि भीमा नदीतही एप्रिलमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

उजनी प्रकल्पातून घेण्यात येणाऱ्या पाण्यावर शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या पाणीपट्टीत पाच-सहा पट वाढ करण्यात आली असून आजच्या दुष्काळाच्या परिस्थितीत ही अन्यायकारक असल्याची बाब आमदार रोहित पवार यांनी या बैठकीत मांडली आणि ही वाढ रद्द करण्याची विनंती केली. त्यानुसार याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा मुद्दाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या बैठकीत मांडला.

कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कुकडी आणि घोड प्रकल्पातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी या मागणीसाठी पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांनी याबाबत पत्र देऊन पाणी नियोजनाची बैठक घेऊन १ मार्च रोजी पाणी सोडण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार आज (शनिवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला आमदार रोहित पवार हेही उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांची मागणी लावून धरताना कुकडीचे आवर्तन हे ४० दिवसांचेच असावे असा आग्रह धरला. अन्यथा सर्व गावांना पाणी मिळणार नाही आणि लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल याची कल्पनाही दिली आणि मे अखेरीस किंवा जून महिन्याच्या आसपास आणखी एक आवर्तन सोडण्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला. त्यानुसार १ मार्च रोजी कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आमदार रोहित पवार यांनी केलेल्या मागणीनुसार घोड प्रकल्पातूनही १ मार्च रोजी आवर्तन सोडण्यात येणार आहे.

सध्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून मतदारसंघातील ऊस, कांदा, भाजीपाला आणि चारा पिकेही धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांच्या मागणीचा पाठपुरावा करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण केलं. त्यानुसार कुकडी आणि घोड प्रकल्पातून १ मार्च रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला, याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे आभार! मात्र कुकडीतून सीना धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला आमदार राम शिंदे यांनी विरोध केल्याने माझ्या मतदारसंघावर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी आमचा संघर्ष सुरुच राहील.’’
- रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)

दरम्यान, सिना धरणातील पाणी पातळीही खालावली असून कुकडी प्रकल्पातून भोसेखिंड मार्गे सीना प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असल्याने हा मुद्दाही आमदार रोहित पवार यांनी बैठकीत मांडला. परंतु विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांनी पाणी सोडण्याची गरज नसल्याचे सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कर्जत तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी योजना या भीमा नदीतील पाण्याशी संबंधित आहेत. त्यामुळे या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीतून एप्रिलमध्ये पाणी सोडण्याची मागणीही आमदार रोहित पवार यांनी यावेळी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

संबंधित लेख

लोकप्रिय