पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे दीपावली साजरी
शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यातर्फे दीपावली फराळाचे वाटप
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : सर्वत्र दिवाळी आनंदाने आणि उत्साहाने साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब मात्र या आनंदापासून दूर राहू नयेत. या वंचित घटकांना देखील दीपावलीचा आनंद घेता यावा, यासाठी सर्वानीच पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथील गरीब आणि अनाथ मुलांसाठी आज दीपावली साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, कार्यवाह सतीश गोरडे, विश्वस्त मिलिंद देशपांडे, कोशाध्यक्ष रवी नामदे, सदस्य आसाराम कसबे, ‘डीआरडीओ’चे शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर, शिक्षण विभाग प्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, अतुल आडे, योगेश चिंचवडे, अजित कुलथे, रवींद्र देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे यांच्या वतीने गुरुकुलम येथील मुलांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने या विद्यार्थ्यांसाठी फराळाचे साहित्याचे वाटप करण्यात आले.
शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, दीपावली हा दिव्यांचा सण असून या सणामध्ये प्रत्येक जण आनंद व्यक्त करत असतो. गरीब, निराधार या मुलांना देखील आनंद व्यक्त करण्याचा अधिकार आहे. दीपावलीच्या निमित्ताने आम्ही सर्व जण आपल्यासोबत आहोत, हा विश्वास मुलामध्ये निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आमच्या वतीने करण्यात आला.
“वंचित, निराधार मुले देखील सामाजाचा घटक आहेत. यांना देखील आपल्या प्रमाणे सण, समारंभ यांचा आनंद घ्यायचा असतो. परंतू, त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे या गोष्टींचा आनंद घेता येत नाही. यासाठीच सर्वानीच या मुलांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.