मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारच्या बहुमत चाचणीवेळी गैरहजर राहिलेल्या काँग्रेसच्या आमदारांची काँग्रेस (Congress) हायकमांडने गंभीर दखल घेतली आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलेल्या आमदारांबाबातची तक्रार काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. या बहुमत चाचणीवेळी काँग्रेस ११ आमदार गैरहजर होते.
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची काही मतं फुटल्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. राज्यसभेच्या निवडणूकीत देखील महाविकास आघाडीला धक्का बसला. अशा वेळी शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळीही काँग्रेसचे ११ आमदार अनुपस्थित होते. यापैकी ९ आमदारांना पक्षाने नोटीस बजावली आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख आदी आमदार विलंबाने पोहोचले. त्यामुळे त्यांना बाहेर लॉबीतच थांबावे लागले होते.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. ज्यांनी क्रॉस व्होट केले आणि जे फ्लोअर टेस्टला गैरहजर राहिले अशा आमदारांवर कारवाई करावी याबाबतचा अहवाल सादर केला असून या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.