सांगली : लोक साहित्याच्या ख्यातनाम अभ्यासक, ज्येष्ठ संशोधक लेखिका डॉ. तारा भवाळकर यांना २०२०- २१ साठीचा “पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार” सांगली येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
रुपये एक लाख व स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेला हा अतिशय मानाचा पुरस्कार आहे. यावेळी पुरस्कार समितीच्या वतीने लोकनेते पद्मश्री डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था (प्रवरानगर) चे संचालक संजीव जोशी, प्रवरा सहकारी बँक (लोणी) चे चेअरमन अशोकराव म्हसे, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना (प्रवरानगर) चे संचालक कैलास तांबे, साखर कारखान्याचे कार्यालयीन अधिक्षक मधुकर चौधरी आणि पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार निवड समिती (लोणी) चे निमंत्रक डॉ. राजेंद्र सलालकर यांनी सांगली येथे येऊन डॉ.तारा भवाळकर यांना हा पुरस्कार प्रदान केला.
डॉ.अनिल मडके यांच्या श्वास हॉस्पिटल मधील जनस्वास्थ्य सभागृहात हा सोहळा झाला. प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत केले. डॉ. राजेंद्र सलालकर यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार समितीच्या वतीने संजीव जोशी यांनी मनोगत व्यक्त केले डॉ.अविनाश सप्रे व डॉ.अनिल मडके यांनी भावाळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. डॉक्टर तारा भवाळकर यांनी सत्काराला उत्तर देणारे हृद्य मनोगत व्यक्त केले. या पुरस्कार प्रदान समारंभाला, संजय पाटील , भीमराव धुलुबुळू, डॉ.आशा कराडकर, प्रतिमा सप्रे, नीलम माणगावे, अभिजीत पाटील, वर्षा चौगुले, डॉ.शोभा काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील स्नेहीजन उपस्थित होते. महेश कराडकर यांनी आभार मानले.
हा प्रतिष्ठित पुरस्कार पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीदिनी प्रदान करण्यात येतो. गेल्या डिसेंबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभहस्ते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ.तारा भवाळकर उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. त्यामुळे हा पुरस्कार पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य व कलागौरव पुरस्कार समितीच्या विश्वस्तांच्या वतीने सांगली येथे येऊन प्रदान करण्यात आला.