रत्नागिरी : कोरोना काळात जिल्हाधिकारी नंदुरबार डाॅ. राजेंद्र भारूड यांनी जिल्हात ऑक्सीजन प्लांट सुरू करून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या चांगल्या कामाची महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर दखल घेतली जात आहे.
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही डाॅ.राजेंद्र भारूड यांच्या कामाचे कौतुक केले आहे व इतर जिल्ह्याने सुद्धा नंदुरबार जिल्ह्यात तयार केलेल्या ऑक्सीजन प्लांटचा आदर्श घ्यावा. नंदुरबार जिल्ह्यातील कामाची प्रेरणा घ्यावी, असे गौरवोद्गार काढले आहेत.
मराठी व हिंदी न्यूज चॅनेलवरही “नंदुरबार जिला बना देश के लिए मिसाल” अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. नंदुरबार सारखा एक आदिवासी जिल्हा संपूर्ण देशासाठी आदर्श बनतो. ही नुसती नंदुरबारवासीयांसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र साठी अभिमानाची बाब आहे. डाॅ.राजेंद्र भारूड हे कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत. नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाल्यापासून त्यांचे खूपच चांगले काम जिल्ह्यात सुरू आहे.
डाॅ.राजेंद्र भारूड हे स्वत: आदिवासी समाजाचे असून त्यांचे जीवन आदिवासी भागात व्यतीत झाले आहे. त्यामुळे आदिवासी लोकांच्या समस्या त्यांना चांगल्या माहिती आहेत. त्या सोडवण्यासाठी ते सतत कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या या चांगल्या कामाला काही राजकारणी कडाडून विरोध करत आहेत.
कोरोनावरून खासदार डाॅ.हिना गावीत व माजी आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यात कलगीतूरा सुरू असून आरोप प्रत्यारोप होत आहेत. खासदार हिना गावीत यांनी रेमडिसीवर व ऑक्सीजन प्लाॅट बाबतीत डाॅ.राजेंद्र भारूड यांच्या वर गंभीर आरोप करत आहेत. परंतु संपूर्ण देश नंदुरबार च्या ऑक्सीजन प्लांटचा आदर्श घेत असताना जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांच्या वर हिना गावीत आरोप करत आहेत, हे कुठेतरी जनतेला चूकीचे वाटत आहे.
हिना गावीत यांच्या जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या विरोधातल्या या भूमिकेमुळे अनेकांनी हिना गावीतवर टिका केली आहे व आदिवासी कार्यकर्ते काही अंशी नाराज झाले आहेत. जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या चांगल्या कामाविरोधात राजकारण करणा-या राजकारणांवर नंदुरबारकर व संपूर्ण आदिवासी समाजच नाराज आहे. म्हणून कोरोनाच्या या संकटकाळी राजकारण्यांनी राजकारण न करता जनतेच्या हिताचा विचार करावा. कोरोनाचे राजकारण न करता समाजकारण करावे.
आज नंदुरबार जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. संपूर्ण देशात ऑक्सीजनची टंचाई सुरू असताना नंदुरबार जिल्ह्यात 2 ऑक्सीजन प्लांट सुरू करून डाॅ.राजेंद्र भारूड यांनी अनेक रूग्णांचे जीव वाचवून चांगले काम केले आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याच्या अगोदर पासूनच जिल्हाधिकारी नंदुरबार भारूड यांनी ऑक्सीजन प्लांट व इतर आरोग्य सुविधांचे नियोजन सुरू केले होते. ऑक्सीजन प्लांटची त्यांची संकल्पना सर्वांनाच आवडलेली आहे. संपूर्ण देशभर त्यांच्या कामाचा बोलबाला सुरू आहे. म्हणून सर्वच राजकारण्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या चांगल्या कामाला सहकार्य करायला पाहिजे. यातच जनतेचे हित आहे, असे मत समाजिक कार्यकर्ते तथा बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग प्रमुख व अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी व्यक्त केले.
डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या चांगल्या कामाचे मी समर्थन करत असून चांगल्या कामाला विरोध करणा-या राजकारण्यांचा धिक्कार करत आहे. डाॅ.राजेंद्र भारूड यांना त्यांच्या चांगल्या कामासाठी आमची बिरसा क्रांती दल संघटना सदैव सहकार्य करीत राहील . वेळ पडली तर चूकीच्या राजकारण्यांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनही करेल. म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांना राजकारण्यांनी एकटे समजू नका. आदिवासी संघटना त्यांच्या सोबत आहेत. राजकारण्यांना बाजूला सारून सर्व आदिवासी संघटनांनी या क्षणी डाॅ.राजेंद्र भारूड यांच्या चांगल्या कामाला सपोर्ट केला पाहिजे, असे आवाहन पावरा यांनी केले आहे.