Tuesday, September 17, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषविशेष लेख : आदिवासींचे भाग्यविधाते, शिक्षणमहर्षी आमदार कै. कृष्णराव मुंढे 

विशेष लेख : आदिवासींचे भाग्यविधाते, शिक्षणमहर्षी आमदार कै. कृष्णराव मुंढे 

काही माणसं माणूस म्हणून जन्माला येतात आणि देव होऊन जातात. समाजासाठी, समाजबांधवांच्या प्रगतीसाठी अशी माणसं अहोरात्र चंदनाप्रमाणे झिजतात आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने जनसामान्यांच्या अंत:करणात कायमचे स्थान प्राप्त करतात. फुलांचा सुगंध जसा अल्पकाळ का होईना आपोआप बागेत दरवळतो त्याप्रमाणे अशा माणसांचा कीर्तीरुपी सुगंध दिर्घकाळ समाजामनात दरवळत राहतो. अशी माणसं स्वहित पाहतील, तर शिकून खूप मोठी होतील, गलेलठ्ठ पगार घेतील, सुशिक्षित, सुसंस्कृतही होतील आणि ऐषोआरामातील चैनी जीवनही जगतील. परंतु अशा माणसांच्या मनात आपल्या समाजाचे काय? असा प्रश्न पडतो तेव्हा त्यांच्या हातुन समाजाचा प्रपंच घडतो आणि समाजही त्यांना देवपण बहाल करून त्यांची तसबीर देवघरात विराजमान करतो. समाजासाठी अलौकिक काम करणाऱ्या अशा माणसांची समाजात नेता म्हणून नाही तर तपस्वी म्हणून पूजा होते. जुन्नर तालुक्यातील आदिवासी डोंगराळ दुर्गम भागातील एका लहानशा खेड्यात असे भारदस्त, रुबाबदार, प्रभावी व्यक्तिमत्त्व जन्माला आले आणि जुन्नरचे आमदार झाले ते म्हणजे कृष्णराव मुंढे होय. 

एकेकाळी महाराष्ट्र विधानसभेत सर्वात तरूण वयात आमदार म्हणून निवडून आलेले शरदराव पवार यांच्यानंतरचे दुसरे तरूण आमदार म्हणजे जुन्नरचे अठ्ठावीस वर्षांचे कृष्णराव मुंढे होय. त्याकाळात एम. ए. झालेल्या कृष्णराव मुंढे यांच्यापुढे भरघोस पगाराच्या नोकऱ्या हात जोडून उभ्या होत्या ; परंतु आपल्या मागासलेल्या, अशिक्षित समाजाला शिकवून शहाणे करण्यासाठी, दिन – दलितांच्या उद्धारासाठी त्यांचा वाटाड्या होणे त्यांनी पसंत केले.

जुन्नर तालुक्यातील राजूर या गावात आई धोंडाबाई आणि वडील रामचंद्र या अतिशय कष्टाळू आणि मेहनती दाम्पत्याच्या पोटी कृष्णराव मुंढे यांचा जन्म शुक्रवार दिनांक २ एप्रिल १९३४ रोजी झाला. कुकडी खोऱ्यातील एक दुर्गम मागासलेले पण निसर्गसौंदर्याने नटलेलं कुकडी नदी तीरावर वसलेलं छोटंसं टुमदार राजूर गाव म्हणजे गरिबी आणि गैरसोय याचं उत्तम उदाहरण होय. केवळ चौथीपर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या राजूरच्या शाळेत वयाच्या सातव्या वर्षी छोटा कृष्णराव इयत्ता पहिलीत दाखल झाला.

चौथीनंतर घोडेगाव येथे कधी वसतिगृहात राहून तर कधी राजूर – जुन्नर किंवा राजूर – घोडेगाव असा संपूर्ण पायी प्रवास करत कृष्णराव इयत्ता सातवीत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला आणि आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. जुन्नरमधील आताच्या शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयात कृष्णरावांनी इयत्ता ८वी मध्ये प्रवेश घेतला खरा ; परंतु काही घरगुती अडचणींमुळे त्यांना दहावीची परीक्षा देता आली नाही. आदिवासी समाजातील मॅट्रिकपर्यंत जाणाऱ्या मोजक्या मुलांची नोंद पुण्यातील मीना लाॅजच्या भाऊसाहेब राऊत यांच्याकडे असायची. शालेय जीवनात उत्तम खेळाडू, जलतरणपटू आणि कुस्तीपटू असलेल्या कृष्णराव मुंढे या विद्यार्थ्याने मॅट्रिकची परीक्षा न देणे भाऊसाहेबांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी कृष्णराव मुंढे यांची नाशिक येथील खेताडे गुरुजींच्या वसतिगृहात रवानगी केली आणि नाशिक केंद्रातून परीक्षा देऊन उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेला कृष्णराव मुंढे हा जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील मॅट्रिक होणारा पहिला विद्यार्थी ठरला. 

वडिलांच्या इच्छेनुसार नोकरीच्या शोधात कृष्णराव काही दिवस मुंबईला राहिले, परंतु पुढे पुणे येथील खडकीच्या ॲम्युनेशन फॅक्टरीमध्ये लेखनिक पदावर त्यांना नोकरीची संधी मिळाली. आयुष्यात सर्वार्थाने यशस्वी व्हायचे असेल तर उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त करण्याशिवाय गत्यंतर नाही असे पुण्यातील वास्तव्यात कृष्णरावांच्या लक्षात आले. पुण्यातील सुशिक्षित उच्चभ्रू वर्ग आणि आपला मागासलेला अशिक्षित समाज यामधील अंतर उच्चशिक्षणाशिवाय कमी होणार नाही असे लक्षात आल्याने नोकरी करता करता कृष्णरावांनी पुण्याच्या एस.पी. काॅलेजमध्ये प्रवेश घेतला. आदरणीय भाऊसाहेब राऊत आणि रखमाजी सांगडेमामा यांनी विद्यार्थीदशेतच दिलेला समाजसेवेचा कानमंत्र यामुळे कृष्णरावांचा पुण्यातील जनसंपर्क वृद्धिंगत होत राहिला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच उत्तम वकृत्वकला आणि सभाधीटपणा हे गुण कृष्णरावांच्या अंगी विकसित होऊन राजकारण आणि समाजकारणाची झिंग चढतच राहिली. अर्थशास्त्र विषयात एस.पी. काॅलेजमधून बी.ए. पदवी प्राप्त केल्यानंतर कृष्णरावांनी फर्ग्युसन कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयात एम.ए. पदवी संपादन केली. उच्चशिक्षण घेत असताना काही काळ पुणे वेधशाळा आणि पुणे RTO मध्येही कृष्णरावांनी काम केले, पण त्याचबरोबर तरूणांना रोजगार मार्गदर्शन, शैक्षणिक अडचणी सोडविणे, रोजगार संधी उपलब्ध करून देणे अशी कामेही ते तळमळीने करताना दिसत. अशाप्रकारे नोकरी, शिक्षण आणि समाजसेवा सुरु असताना आपल्या गावाला आणि समाजालाही ते विसरले नाहीत. 

समाज परिवर्तन करायचे असेल तर शिक्षण आवश्यक आहे या भावनेतून निमगिरी येथे दिनांक १४ जून १९५४ रोजी सुरू झालेली पहिली ‘आदिवासी शिक्षण संस्था’ स्थापन करताना ज्येष्ठांबरोबर तरुण कृष्णराव मुंढे यांचा सहभाग सर्वांनाच उर्जा देणारा ठरला. सन १९६० मध्ये केवाडी गावी जव्हार संस्थानचे यशवंतराव मुकणेराजे यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी समाजाची मोठी सभा आयोजित केली होती. या सभेसाठी भव्य दिव्य सभामंडप आणि मंचव्यवस्था, ठिकठिकाणी सुशोभीकरण आणि स्वागतासाठी वेशी उभारणे अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. परंतु मुकणेराजे केवाडीला न येता पहिले निमगिरीला गेल्याचे निमित्त झाले आणि राग अनावर झालेल्या समाजबांधवानी निषेध म्हणून मोडतोड सुरू केली. अशा बिकटप्रसंगी तारुण्याच्या उंबरठ्यावरील गोरापान गव्हाळ वर्ण, उंच आणि बलदंड शरीरयष्टी असलेल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या कृष्णराव मुंढे यांनी माईक हातात घेऊन कणखर आवाजात, ‘अरे, तुम्ही असे करू नका, हे तुम्ही काय चालवलंय? असा प्रश्न विचारत सभेचा ताबा घेतला आणि भाषण सुरू केले. बिथरलेला जमाव शांत होत गेला आणि आपसात, ‘अरे हे कोण, कुठले आहेत’ अशी कुजबूज सुरू झाली. सन १९६१ मध्ये आळंदी येथे कार्तिकी एकादशीला आदिवासींचा राज्यव्यापी मेळावा आदिवासी नेते भाऊसाहेब राऊत यांनी आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधित करण्याची संधी तरुण कृष्णराव मुंढे यांना मिळाली आणि आदिवासी समाजाच्या समस्यांचा उहापोह करत त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तळमळीने आणि प्रभावीपणे बोलणारे कृष्णराव मुंढे यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

कृष्णराव मुंढे यांच्या आळंदी येथील वकृत्वाने भाऊसाहेब राऊतही भलतेच प्रभावित झाले होते. योगायोगाने सन १९६२ ची विधानसभा निवडणुक जाहीर झाली आणि नवीन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली. भाऊसाहेब राऊत यांचा राजकीय दरारा असलेल्या कर्जत खालापूर राखीव मतदार संघातील उमेदवार कोण ? असा प्रश्न भाऊसाहेबांसमोर उपस्थित केला गेला. शेतकरी समाजाचे कैवारी असलेले भाऊसाहेब राऊत यांना मानणारा असलेल्या संपूर्ण कर्जत खालापूर मतदार संघात भाऊसाहेब राऊत यांनी ठरवलेल्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडणार होती. 

भाऊसाहेब राऊत यांनी कर्जत खालापूर मतदार संघातील शे.का.पक्षाचा उमेदवार म्हणून जुन्नरचा सुपुत्र कृष्णराव मुंढे या अस्सल हिऱ्याची निवड जाहीर केली. मतदारांनी आपली कामगिरी चोख बजावली आणि वयाच्या केवळ अठ्ठावीसाव्या वर्षी दुसऱ्या तालुक्यातून प्रचंड मताधिक्याने निवडुन येणारे कृष्णराव मुंढे एकमेव आदिवासी आमदार ठरले. त्याकाळात महाराष्ट्र विधानसभेत शरदराव पवार यांच्यानंतरचे दुसरे तरूण आमदार म्हणून कृष्णराव मुंढे यांच्याबद्दल सर्वांनाच कुतूहल वाटत असे. 

देशाला स्वातंत्र्य मिळाले, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले परंतु आदिवासी दुर्गम भागातील जनता अजूनही शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज आदी मूलभूत सुविधांपासून वंचित होती. शिक्षणापासून वंचित असलेला, तळागाळातील पिचलेला माणूस आमदार कृष्णराव मुंढेसाहेबांनी पाहिला होता म्हणून सार्वत्रिक शिक्षण नि:शुल्क असावे असा आग्रह त्यांनी धरला. आश्रमशाळांबरोबरच आदिवासींच्या शिक्षणासाठी मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती अशा शहरांमध्येही वसतिगृह उघडण्यात यावीत अशी आग्रही मागणी आमदार कृष्णराव मुंढे यांनी विधानसभेत लावून धरली.

सन १९५४ ते १९६४ या दहा वर्षांच्या कालखंडात आदिवासी शिक्षण संस्थेच्या वतीने घरोघर फिरून धान्य जमा करून चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांना सरकारी अनुदान मिळवून देण्यात आमदार कृष्णराव मुंढे यशस्वी झाले. सन १९६४मध्ये आदिवासी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पहिल्यांदा आमदार कृष्णराव मुंढेसाहेबांवर सोपविण्यात आली. आमदार कृष्णराव मुंढे यांच्या पुढाकाराने दिनांक १० जून १९६४ रोजी जुन्नर येथे रविवार पेठेत ‘सह्याद्री ज्ञानमंदिर’ ही आदिवासी शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा सुरु करण्यात आली. त्यानंतर खेड, आंबेगाव, पाईट, डेहणे, कण्हेरसर येथील शाळा आणि संस्थेचा विस्तार होत राहिला. जुन्नरला ‘सह्याद्री ज्ञानमंदिर’ सुरू झाले परंतु महाविद्यालयाचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आणि सुदैवाने तो मंजूरही झाला ; परंतु संस्थेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने तो विचार सोडून देण्यात आला. आदिवासींच्या घरात शिक्षणासाठी पोषक वातावरण नसल्याने शाळा निवास आणि भोजन एकत्रित मिळण्याची व्यवस्था यासाठी आश्रमशाळा असाव्यात हा कै. ठक्कर बाप्पांचा मूळ विचार आमदार कृष्णराव मुंढेसाहेबांनी पुढे नेला. दरम्यानच्या काळात वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कृष्णराव मुंढे यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. सन १९६७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार कृष्णराव मुंढेसाहेब आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा उभे राहिले ; परंतु दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्यासारख्या तगड्या उमेदवारासमोर त्यांना हार पत्करावी लागली. 

यादरम्यान आदिवासी मुलामुलींना शिक्षण घेता यावे यासाठी अनेक ठिकाणी वसतिगृहे सुरू करून मुंढेसाहेबांनी खऱ्या अर्थाने असंख्य मुलांचे पालकत्व स्वीकारले. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव मुंढेसाहेबांच्या व्यक्तिमत्वातून प्रतिबिंबित होत असे. सन १९७२मध्ये पडलेल्या भयंकर दुष्काळात लोकांसाठी दुष्काळी कामे, पिण्याचे पाणी, रेशनिंग इत्यादी मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या अनेक मोर्चांचे नेतृत्व कृष्णराव मुंढेसाहेबांनी केले. आदिवासी भागात सावकारशाही दीन – दलितांची आर्थिक पिळवणूक व शोषण मोठ्या प्रमाणात करीत होती. त्यांना पायबंद घालण्यासाठी सन १९७२मध्ये आदिवासी विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. महामंडळाची मूळ कल्पनाच कृष्णराव मुंढे यांची असल्याने ती अंमलात आणण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. खेड, आंबेगाव, जुन्नर या तिन्ही तालुक्यांसाठी एखादा हिरडा कारखाना, आदिवासी विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र आयटीआय अशी मागणी मुंढेसाहेबांनी वारंवार केली. परिणामस्वरूप, पुढे माणिकडोह येथील आयटीआय काढण्यास शासनाने परवानगी दिली आणि येथून प्रशिक्षण घेतलेले असंख्य विद्यार्थी आजही चांगल्या पगारावर नोकरी करत आहेत. आदिवासी भागात सैनिकी शाळा काढण्याचे मुंढेसाहेबांचे स्वप्न होते. 

कृष्णराव मुंढेसाहेबांची कामाची पद्धत पाहून तत्कालीन शासनाने सन १९७२मध्ये त्यांची जिल्हा निवड मंडळावर नियुक्ती केली आणि मुंढेसाहेबांनी असंख्य गोरगरिबांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. सन १९७२मध्ये झालेल्या ग्रामसेवक आणि शिक्षक भरतीमध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ तालुक्यातील अनेक तरूणांना कृष्णराव मुंढेसाहेबांमुळे नोकरीची संधी प्राप्त झाली आणि अनेक कुटुंबाना जीवन जगण्यासाठी आधार मिळाला. 

काॅंग्रेस पक्षाने मुंढेसाहेबांचे नेतृत्वगुण पारखले असल्याने त्यांच्यावर अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. सन १९७८मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जुन्नरमधून भरघोस मताधिक्याने निवडुन आलेले कृष्णराव मुंढे सर्वसाधारण जागेवर निवडूण येणारे महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासातील पहिले आदिवासी आमदार ठरले. या निवडणुकीत आमदार कृष्णराव मुंढेसाहेबांना आदिवासी समाजबांधवानी तर मदत केलीच, परंतु तालुक्यातील इतर सर्व नेत्यांनीही सर्वतोपरी मदत केली. आमदार कृष्णराव मुंढेसाहेबांना तिकीट कसे मिळाले आणि ही निवडणूक कशी झाली याचे अत्यंत रंजक वर्णन ओतूर येथील शिक्षणतज्ज्ञ कै. दा. ना. पाटील डुंबरे यांनी, ‘…आणि कृष्णराव मुंढे आमदार झाले’ या लेखात केले आहे. याच लेखात पिंपळगाव जोगा धरणाचा डावा कालवा काढताना एक थेंबही पाणी जुन्नर तालुक्यातील क्षेत्रांस मिळणार नाही हा शासनाचा डाव नवनिर्वाचित आमदार कृष्णराव मुंढे यांच्या लक्षात आला आणि पूर्वीचा आराखडा बदलून पिंपळगाव, डिंगोरे, उदापूर, ओतूर, पिंपरी पेंढार या गावांच्या वरच्या बाजूने जाणारा नवीन आराखडा आमदार मुंढेनी काढायला लावला याचेही मजेशीर वर्णन कै. दा.ना. पाटील डुंबरे यांनी केले आहे. 

यानंतर पक्षादेशाचे पालन करत आमदार कृष्णराव मुंढेसाहेबांनी विधानसभाध्यक्ष पदाची निवडणूक लढविली, परंतु काही मतांनी त्यांचा पराभव झाला. आमदार पदावर व्यस्त असतानाही अनेकदा मुंढेसाहेब, ‘माझी मुले काय खातात? मला खाऊन पाहू दे’ हे तपासून पाहण्यासाठी अचानक वसतिगृहांना भेट द्यायचे आणि मुलांसाठी बनवलेली भाजी भाकरी तळहाताची प्लेट करून उभ्या उभ्याच स्वतः खाऊन पाहायचे. कधी कधी अचानक कोणत्याही शाळेला भेट देत सरळ एखाद्या वर्गावर जाऊन शिक्षकांनाच प्रश्न विचारायचे, किंवा कधी स्वतःच हातात कसलेही पुस्तक न घेता अभ्यासक्रमातील एखादा उतारा फाड्फाड् शिकवायचे तेव्हा उपस्थित सर्वच विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक अचंबित होऊन पाहत राहायचे. आमदार कृष्णराव मुंढेसाहेबांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील अनेक आदिवासी बांधवांमध्ये प्रेरणा निर्माण झाली. गोंडवन विद्यापीठ स्थापन करण्याचा ठराव विधानसभेत एकमताने संमत झाला त्यामागील मूळ संकल्पना आमदार कृष्णराव मुंढे यांची होती. आमदार कृष्णराव मुंढेसाहेब दरवर्षी महाशिवरात्रीला तीर्थक्षेत्र कुकडेश्वर येथे भव्य समाजमेळावा घेत असत. कृष्णराव मुंढेसाहेब म्हणजे आदिवासी समाजाला ईश्वराने दिलेली देण आहे अशीच सर्व समाजाची भावना होती. 

परंतु नियतीने मात्र वेगळीच योजना आखली असावी. शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर १९८२ हा दिवस समस्त जुन्नरकरांसाठी आणि विशेषतः आदिवासी समाजबांधवांसाठी काळदिवस ठरला. पुणे येथे रात्री साडेदहा वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने कृष्णराव मुंढे यांचे आकस्मिक निधन झाले. रात्री गाढ निद्रेत असलेल्या समाजबांधवांना सकाळी आकाशवाणीवरील प्रादेशिक बातमीपत्र सादर करणाऱ्या वृत्तनिवेदिका सुधा नरवणे यांनी सांगितलेल्या बातमीने प्रचंड धक्का बसला. दुसऱ्या दिवशी जुन्नरला रविवार पेठेतील सह्याद्री ज्ञानमंदिरात मुंढेसाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले तेव्हा अनेकांना भावना अनावर झाल्या. राजूर या त्यांच्या जन्मगावी कुकडी नदी तीरावर शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले.

कृष्णराव मुंढेसाहेब गेले परंतु त्यांनी सुरू केलेला ज्ञानयज्ञ अखंड तेवत राहणार आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध अविरत दरवळत राहील. आदिवासी समाजाचे शिल्पकार असलेले कै. कृष्णराव मुंढे यांनी सुरु केलेल्या सह्याद्री ज्ञानमंदिराचे ‘कृष्णराव मुंढे विद्यालय’ असे बुधवार दिनांक २३ फेब्रुवारी १९८३ रोजी मा. शरदराव पवार यांच्या उपस्थितीत नामकरण करण्यात आले. कृष्णराव मुंढे विद्यालयातील कलाशिक्षक श्री. एस. यु. भालारे यांनी मुंढेसाहेबांच्या कार्याने प्रेरीत होऊन दिवस-रात्र झटून पंचवीस दिवसांत स्वहस्ताने मुंढेसाहेबाचे अर्धाकृती शिल्प घडविले आणि पुढे हेच शिल्प कृष्णराव मुंढे विद्यालयाच्या प्रांगणात स्मारक म्हणून बसविण्यात आले. कै. कृष्णराव मुंढे यांच्या कुशल नेतृत्वामुळे आणि यशस्वी प्रयत्नांमुळे आदिवासी शिक्षण संस्थेची तीन कनिष्ठ महाविद्यालये, सहा माध्यमिक विद्यालये, दोन पोस्ट बेसिक आश्रमशाळा, सात वसतिगृहे जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यात कार्यरत आहेत आणि विविध शाखेतून सुमारे पाच हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सर्व ठिकाणी कै. कृष्णराव मुंढेसाहेब यांची पुण्यतिथी साजरी होते. 

कै. कृष्णराव मुंढे यांच्या सुकन्या सौ. सुरेखाताई मुंढे – तळपे यांनी आदिवासी शिक्षण संस्थेच्या इतिहासात सन २००१ मध्ये प्रथम महिलाअध्यक्षा म्हणून मान संपादन केला आणि आजतागायत खंबीरपणे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. सौ. सुरेखाताई सन २०१२ – १७ या कालावधीत तांबे पाडळी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही कार्यरत होत्या. संस्थेचे सचिव श्री. देवराम मुंढे यांनीही कै. कृष्णराव मुंढेसाहेब यांची अधुरी राहिलेली स्वप्न साकार करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. सन १९७२ – ७४ या काळात निवड मंडळाकडून नोकरीला लागलेली मंडळी आता सेवानिवृत्त झाली आहेत. परंतु कै. कृष्णराव मुंढेसाहेब हे त्यांचे आराध्य दैवत म्हणून त्यांच्या देवघरात आजही पूजले जाते. कै. कृष्णराव मुंढेसाहेबांनी स्वहित पाहिले असते तर त्यांना भरपूर पैसा मिळाला असता परंतु जनसामान्यांच्या ह्रदयातील अढळस्थान प्राप्त झाले नसते. समाजाने आजही कै. कृष्णराव मुंढे यांची आठवण ह्रदयात चिरंतन जपली आहे.

– लेखक : संजय वसंतराव नलावडे

   धोलवड, मुंबई

   मोबाइल – ८४५१९८०९०२

Mahaegs Maharashtra Recruitment

संबंधित लेख

लोकप्रिय