Saturday, May 11, 2024
Homeराज्यतोक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या वीजयंत्रणेची प्रचंड हानी

तोक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या वीजयंत्रणेची प्रचंड हानी

महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरु – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : गेल्या 24 तासांमध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पावसासह प्रामुख्याने रत्नागिरी व  सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील 3 हजार 665 गावांमधील वीजयंत्रणेची प्रचंड हानी झाली आहे. यामध्ये 18 लाख 43 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला असून त्यापैकी 52 टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे. चक्रीवादळ बाधित उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा असे निर्देश देण्यात आले असून महावितरणचे 13 हजार 172 कर्मचारी दुरुस्तीची कामे अविश्रांत करीत आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.

तोक्ते चक्रीवादळामुळे महावितरणच्या 138 उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला होता. त्यापैकी 78 उपकेंद्र सुरु करण्यात आले आहेत. तर 706 पैकी 439 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. दरम्यान मोठे व कोविड रुग्णालयांसह ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, घरगुती ग्राहक आदींचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राधान्याने दुरुस्ती हाती घेतली आहे. यामध्ये चार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांसह 210 पैकी 173 कोविड सेंटर्स व लसीकरण केंद्रांचा वीजपुरवठा अवघ्या अर्धा ते दोन तासांमध्ये पूर्ववत करण्यात आला. उर्वरित ठिकाणी वीजपुरवठा सुरु करण्याचे काम सुरु आहे. आज दुपारपर्यंत चक्रीवादळ बाधित सातही जिल्ह्यातील 9 लाख 35 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक, 1284 शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजना, 765 मोबाईल टॉवर्सचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागासह सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा येत्या ४८ तासांमध्ये सुरु करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र, सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर अतितीव्र स्वरुप धारण केलेल्या चक्रीवादळामुळे वीजयंत्रणेची सर्वाधिक हानी झाली आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी माहिती दिली की, चक्रीवादळामुळे वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. याकरिता मुंबई मुख्यालयस्तरावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे. यामध्ये तीन मुख्य अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या भागातील अधिकाऱ्यांसोबत वीजपुरवठ्याबाबत ते समन्वय साधत आहेत. तसेच मुख्यालयातील दोन मुख्य अभियंत्यांना सिंधुदुर्ग येथील वीजयंत्रणेच्या कामाची निकड लक्षात घेऊन  समन्वय साधण्यासाठी नियुक्त केले आहेत व ते आजच रवाना झाले आहेत. त्याचप्रमाणे बारामती व कोल्हापुरातील तांत्रिक कर्मचाऱ्यांनासुध्दा येथील कामासाठी पाठविण्यात आले आहे. याशिवाय चक्रीवादळ बाधीत भागात महावितरणचे नियमित, बाह्यस्त्रोत कर्मचारी आणि  एजन्सीज युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे करीत आहे.

चक्रीवादळामुळे होणाऱ्या वीजयंत्रणेचे नुकसान लक्षात घेऊनच 622 वितरण रोहित्र, 347 किलोमीटर वीजवाहिन्या, 3439 किलोमीटर वीजतारा, 20 हजार 498 वीजखांब, 12 मोठी वाहने, 46 जेसीबी व क्रेन, सुमारे 300 दुरुस्ती वाहने संबंधीत जिल्ह्यात उपलब्ध असून मागणीप्रमाणे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या  चक्रीवादळामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे सातत्याने चक्रीवादळ बाधित भागातील वीजपुरवठ्याबाबतची माहिती घेत असून सतत मार्गदर्शन करीत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून आपण प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंत्यांच्या संपर्कात राहून दरतासाला आढावा घेत असून आवश्यक त्या सूचना निर्गमित करीत आहे, अशी माहिती देखील सिंघल यांनी दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय