अकोले : आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या हिरडा झाडाची आदिवासी भागात लागवड वाढावी यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर हिरडा रास्त भाव, लागवड व सातबारावर नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. (Akole)
महाराष्ट्रामध्ये अकोले, जुन्नर व आंबेगाव या तालुक्यांमधील आदिवासी भागात हिरड्याचे उत्पन्न घेतले जाते. हजारो आदिवासी कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन असलेला हिरडा विविध कारणामुळे संकटात सापडू पाहत आहे. हिरड्याची काढणी कळी अवस्थेत असलेल्या बाळ हिरड्याच्या रूपात केली जात असल्यामुळे हिरड्याचे परिपक्व बीज जंगलामध्ये पडत नाहीत व लागवडीसाठी सुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. शिवाय हिरड्याचे बीज कवच टणक असल्यामुळे ते जनावरांच्या पोटात काही काळ राहिल्यानंतर शेणावाटे बाहेर पडले तरच उगत असते.
कृत्रिमरीत्या रोपवाटिकेत रोपे तयार करताना सुद्धा हिरड्याचे बीज पंधरा दिवस शेणगाऱ्यांमध्ये भिजत ठेवावे लागते, मगच त्याची लागवड करता येते. शिवाय जनावरांच्या पोटात राहिल्यानंतर शेणावाटे बाहेर पडणारे किंवा रोपवाटिकेत कृत्रिम रित्या शेण गाऱ्यात पंधरा दिवस भिजत ठेवलेल्या बियाण्यांची उगम क्षमता सुद्धा केवळ 50 टक्केच असते. या सर्वांचा परिणाम म्हणून जंगलामध्ये हिरड्याची झाडे उघडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. जुनी झाडे कशाबशा पद्धतीने तग धरून आहेत. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या हिरडा उत्पादनावर सुद्धा याचा वाईट परिणाम होताना दिसतो आहे. (Akole)
शासकीय योजनांच्या माध्यमातून वन विभागाच्या वतीने विदेशी झाडांचे रोपण जंगलामध्ये होते, मात्र ही विदेशी झाडे झपाट्याने वाढतात, त्याला जनावरे खात नाहीत, हे जरी खरे असले तरी या झाडांमुळे पारंपारिक हिरडा, बेहडा, आवळा, चिंच, बोर, यासारखे झाडे नष्टप्राय झाली आहेत. जंगलामधील प्राण्यांना या पारंपारिक झाडांमुळे खाद्य मिळत होते हे खाद्यही मिळेनासे असे झाले आहे. परिणामी जंगलामधील सांबर, रानडुकरे, बिबट्या हे आपला आदिवास सोडून नागरी वस्त्यांकडे आणि शेतकऱ्यांच्या शेताकडे कुच करताना दिसत आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (Akole)
शेतकऱ्यांच्या जीवाला धोका होईल इतक्या मोठ्या प्रमाणात उसाच्या शेतांमध्ये बिबट्या आढळून येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जंगल राखणे ही नितांत गरज बनली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता अखिल भारतीय किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भागात हिरडा लागवड वाढावी यासाठी अभियान सुरू केले आहे.
जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी शेतकऱ्यांना या अंतर्गत दोन वर्ष वाढलेली हिरड्याची झाडे वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली असून किसान सभेचे प्रशिक्षित कार्यकर्ते बांधिलकी ठेवत या अभियानामध्ये उतरले आहेत. अभियानाची व्याप्ती वाढावी व परिणामकारकता वाढून योग्य परिणाम साध्य करता यावा यासाठी किसान सभेच्या वतीने कोतुळ दत्त मंदिर या ठिकाणी 14 ऑगस्ट रोजी तसेच शेंडी या ठिकाणी 16 ऑगस्ट व राजूर या ठिकाणी 19 ऑगस्ट रोजी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये हिरडा लागवडीबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार असून हिरडा रोपे उपलब्ध करून देऊन ती प्रत्यक्षात लावण्याबाबत सखोल नियोजन करण्यात येत आहे. शिवाय येत्या हिरड्या हंगामामध्ये हिरड्याची पक्व बीजे गोळा करण्याबाबत सुद्धा नियोजन करण्यात येत आहे.
अकोले तालुक्यातील सर्व वनविभागांच्या कार्यालयाला व रोपवाटिकांना किसान सभा व माकपच्या वतीने संपर्क करण्यात आला असून येत्या काळात हिरडा रोपे मोठ्या प्रमाणात तयार करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ.अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, तुळशीराम कातोरे, ज्ञानेश्वर काकड, वसंत वाघ, शिवराम लहामटे, प्रकाश साबळे, भीमा मुठे, दत्ता गोंदके, गणपत मधे, सोमा मधे, कैलास वाघमारे, चंदर उघडे, लक्ष्मण घोडे यांनी दिली.
हेही वाचा :
मोठी बातमी :…तर लाडकी बहीण योजना थांबवू ; सर्वोच्च न्यायालयाचा इशारा
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या
बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले