संभाजी सुर्वे, लहू खारगे यांच्यासह कर्मचाऱ्यांवरील दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्या
वडवणी, दि. २० : बीड येथे कोरोना कर्मचाऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात व उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या निषेधार्थ कस्तुरबा गांधी बालिका वस्तीगृह कोरोना केअर सेंटर वडवणी येथे दिवसभर सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून रुग्णसेवा केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून अनेक कोविड सेंटर बंद पडले आहेत, यामध्ये काम करत असलेला सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने कामावरून कमी केले आहे. या कर्मचाऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून सर्वांचे भवितव्य अंधारात गेले आहे. हाताला काम नसल्यामुळे अनेक कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे तर अनेकांच्या मुलांच्या शिक्षणाचा मुद्दा अत्यंत गंभीर विषय निर्माण झाला असून या कर्मचाऱ्यांना समोर अनंत अडचणी निर्माण झाले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री बीड जिल्हा दौऱ्यावर असता सर्व शासकीय सेवेमध्ये कायम करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन घेऊन कोरोना कर्मचारी मंत्र्यांना निवेदन देण्यास गेले असता त्यांनी कोरोना कर्मचाऱ्यांना वेळ दिला नाही. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. यावेळी अनेक अडचणी पार करून निवेदन देण्यासाठी गेलेल्या संतप्त कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचा ताफा आडवला असता बीड पोलिसांच्या व प्रशासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला यामध्ये अनेक स्टाफ नर्सेस, वॉर्डबॉय व अन्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी हात उचलला, लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक कर्मचारी किरकोळ जखमी झाले.
आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले कर्मचाऱ्यांचे नेते संभाजी सुर्वे, लहू खारगे यांच्यासह २०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यावर बीड पोलिसांच्यावतीने गुन्हे दाखल करण्यात आले असून हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी यावेळी वडवणी कोरोना केअर सेंटर येथील सर्व कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी या घटनेच्या निषेधार्थ सर्व कर्मचाऱ्यांनी दिवसभर काळ्या फिती लावून रुग्णसेवा केली. यावेळी कामावरून कमी करण्यात आले सर्व कर्मचारी व अन्य कर्मचारी उपस्थित होते.