पैठण : मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेल च्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीच्या विरोधात पैठण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पैठण तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे आंदोलन काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार कल्याण काळे व माजी मंत्री अनिल पटेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
केंद्र सरकारने देशात मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेल दरवाढ केली आहे. याचा आर्थिक बोजा सर्वसामान्य जनतेवर पडत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या बॅरल चे भाव कमी असतानाही ही दरवाढ करण्यात आली आहे. याचाच निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलन कर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्फत थेट राष्ट्रपतींना पाठवले आहे.
या आंदोलनाचे आयोजन पैठण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद तांबे यांनी केले होते. यावेळी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मीनाताई शेळके, जि. प.सदस्या पल्लवी नवथर, प्रदेश सचिव रविंद्र काळे,युवक काँग्रेसचे पैठण तालुका अध्यक्ष किशोर दसपुते, रावसाहेब नाडे, हरिपंडित गोसावी, दिलीपराव भोसले, पाषाभाई धांडे तसेच इतर विविध सेलचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.