Saturday, May 18, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषरविवार विशेष: कॉ. भवलकर प्रेरणादायी खंबीर संघर्षशील नेत्रृत्व - भाऊसाहेब झिरपे

रविवार विशेष: कॉ. भवलकर प्रेरणादायी खंबीर संघर्षशील नेत्रृत्व – भाऊसाहेब झिरपे

कॉम्रेड उद्धव भवलकर यांच्या अचानक जाण्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे व सिटूचे अर्थात कामगार चळवळी चे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या आठवडयात  श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काल पोटातील आतडयाची शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु आज दि.५ सप्टेंबर २०२० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

१२ मार्च १९५२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील  त्यांचा जन्म झाला. ७०च्या दशकात  डाव्या चळवळीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची पताका खांद्यावर घेऊन मोहा येथे एस एफ आय या विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेची पहिली  शाखा केली, आणि आज तेव्हा लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला .पुढे उद्धव भवलकर यांनी आपल्या कळंबला १९७५ला एस एफ आयचे पहीले राज्य अधिवेशन भरवले. व पहील्या अखिल भारतीय अधिवेशनात त्यांनी डॉ. विठ्ठल मोरे, कॉ.अरून शेळके यांच्या सह राज्याचे प्रतिनिधीत्व केले.या मुळे एस एफ आयचे संस्थापन सदस्य म्हणून आम्ही त्यांना खूप आदराने ओळखत होतो.१९७५ते१९८१ च्या  संगमनेर राज्य अधिवेशना पर्यंत ते सक्रिय नेते म्हणून कार्यरत होते.

संगमनेर अधिवेशनात विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी निवृत्ती घेतली. ते क्रांतिसिंह नाना पाटील व मा. खा. गंगाधर अप्पा बुरांडे यांना आदर्श मानत. गंगाधर अप्पांच्या शब्दाखातर त्यांनी औरंगाबाद येथील सिटूची धूरा खांद्यावर घेऊन आजतागात सांभाळली आज कामगार चळवळीसह मराठवाड्यात हे नाव आदराने घेतले जाते त्याचे कारण म्हणजे स्वतः च्या जिवाची बाजी लावून त्यांनी ही चळवळ उभी केली. औरंगाबादेत  काम करतांना मालकांच्या गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यातून ते बचावले आणि अख्खे आयुष्य कामगार चळवळीत झोकून दिले. आज ते सिटू च्या राज्यउपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. मी एस एफ आय मधे असतांना त्यांना शिवजयंती निमित्त टाकरवण ला बोलावल पुढे मी विद्यापीठात आलो तेव्हा ते माकप औरंगाबादचे जिल्हा सचिव व औरंगाबाद सिटू चे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पहात होते. माझी एस एफ आय च्या राज्याध्यक्ष पदी निवड करतांना औरंगाबाद चे जिल्हा सचिव म्हणून त्यांची सम्मती आवश्यक होती पक्षाने विचारणा करताच त्यांनी आनंदाने होकार दिला.

आज औरंगाबाद मधे असलेले टूमदार सिटू भवन हे संघटना व पक्षाचे कार्यालय त्यांनी उभा केले. संघटनात्मक व संस्थात्मक चळवळ उभी राहिली पाहीजे हा त्यांचा अट्टाहास होता.म्हणून शहीद भगतसिंग क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या मुलां मुलींसाठी शाळा सुरू केली. आज ही संस्था मोठी आहे. या मंडळाच्या माध्यमातून क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. सर्व आघाडीवर सदैव सक्रिय व मार्गदर्शक म्हणून त्यांचे मोठे योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढयातील नामांतर योद्धा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच मराठवाडा विकास आंदोलनातही ते सक्रिय सहभागी होते. 

या दोन्ही आंदोलनाच्या आठवणी त्यांच्या कडून ऐकतांना अंगावर काटे येत. सततचा संघर्ष हे आयुष्याचे समिकरण स्विकारुन कॉम्रेड भवलकर नेहमी प्रेरणादायी राहतील. शरीराने ते आपल्यात नसल्याचे दु:ख व सल कायमस्वरूपी राहील. त्यांच्या जाण्याने आज मराठवाड्यातील डावी व कामगार चळवळ पोरकी झाली. तर विद्यार्थी यूवक व किसान चळवळी  मार्गदर्शकांना मुकली आहे. ५ सप्टेंबर २०२० ला एक दीडच्या दरम्यान त्यांनी निरोप घेतला आणि एक प्रेरणादायी जीवनप्रवास थांबला आहे.कॉ. भवलकर प्रेरणादायी खंबीर  संघर्षशिल नेत्रृत्व कामगार व डावी चळवळ औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात वाढवणे हीच खरी श्रद्धांजली. या लढाऊ कामगार नेत्यास क्रांतिकारी अभिवादनासह अखेरचा लालसलाम

– कॉ. भाऊसाहेब झिरपे

– माजी राज्य अध्यक्ष SFI महाराष्ट्र तथा जिल्हा सचिव किसान सभा. औरंगाबाद

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय