Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड शहरातील नागरी आरोग्य, सुरक्षा धोक्यात ? नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

पिंपरी चिंचवड शहरातील नागरी आरोग्य, सुरक्षा धोक्यात ? नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

पिंपरी चिंचवड : कोरोना महामारीच्या काळात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनावर निकृष्ट रस्तेविकास आणि सर्वत्र पसरलेले अनारोग्य यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. यंदा मान्सूनच्या पावसामुळे शहरातील शेकडो रस्त्याची चाळण झाली आहे. रस्ते विकास, जलपर्णीनिर्मूलन, नालेसफाई, सांडपाणी निचरा, भूमिगत गटारे यासाठी मोठा पैसा खर्च करण्यात आला, परंतु येथील नागरिकांना सुरक्षित रस्ते, निरामय आरोग्य अद्यापही देण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरल्याचे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील काही नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

सरकार अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासन सुस्त आहे

शहरात डेंग्यू, मलेरिया, सर्दी, पडसे यामुळे लहान मुले, तरुण, जेष्ठ नागरिक आजारी पडत आहेत. शहरातील चिखली, कुदळवाडी, तळवडे, मोरे वस्ती या उपनगरात सांडपाणी निचरा व्यवस्थापन, रस्ते विकास करताना नागरी सुरक्षा, नागरी आरोग्य याकडे दुर्लक्ष झाले. केंद्र आणि राज्य सरकारने स्वछ भारत अभियाना अंतर्गत पारितोषिके मिळवून अमाप प्रसिद्धी मिळवली. ठराविक रंगरंगोटी, इव्हेंट, पेपरवर्क करून मिळवलेली ही प्रसिद्धी निव्वळ धूळफेक होती. राज्यात आणि शहरात सरकार अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासन सुस्त आहे.

यशवंत कण्हेरे, जेष्ठ नागरिक, अध्यक्षःकर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच महात्माफुलेनगर चिंचवड

निर्धारित वेळेत नियोजनपूर्वक काम केले पाहिजे

पावसाळ्या पूर्वी शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण होऊन उपनगरात कुठेही सांडपाणी तुंबणार नाही, रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, याची काटेकोर काळजी पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाने घेतली नाही. निर्धारित वेळेत नियोजनपूर्वक काम केले पाहिजे. शहरातील खड्ड्याची आकडेवारी जाहीर करून त्याची डागडुजी केल्याची माहिती देणारे प्रशासन स्वतःच्या अपयशाची कबुली करदात्या नागरिकांना देत आहे, हे या स्मार्ट सिटीचे दुर्दैव आहे.

सुनील कोल्हे – औद्योगिक कर्मचारी, शाहूनगर

स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रशासनाला खडबडून जाग येणार तरी कधी ?

नागरिकांच्या हितासाठी पावसाळ्या अगोदर रस्ते दुरूस्ती नाले साफसफाई करणे हे अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. प्रत्यक्षात स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रशासनाला या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून द्यावे लागणे हेच दुर्दैव. रस्त्यांविषयी बोलायचे झाल्यास निवडणूका तोंडावर आल्या की रस्ते तयार करतानाची लगबग दिसते. पण ते रस्ते तरी निकृष्ट दर्जाचे नसावेत हे बघणार कोण? माझ्या घरासमोरील रस्ता मध्येच ऊंच मध्येच खड्डा अशा अवस्थेत आहे. पावसाळ्यात संपुर्ण गल्ली पाण्याने भरलेली होती. या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उतार दिला नाही. या साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे मलेरियाचे डास त्यांची अंडी सापडतात. याची जबाबदारी कोण घेणार ?

सोनाली मन्हास – गृहिणी, रुपीनगर, तळवडे

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय