Thursday, April 25, 2024
Homeविशेष लेखक्रांतिसिंह नाना पाटील: भारताला पडलेले समाजवादाचे रांगडे स्वप्न - प्रा. माया पंडित

क्रांतिसिंह नाना पाटील: भारताला पडलेले समाजवादाचे रांगडे स्वप्न – प्रा. माया पंडित

आज क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील यांचा जन्मदिन. ३ ऑगस्ट १९०० रोजी जन्म झालेल्या नाना पाटलांनी ६ डिसेंबर १९७६ रोजी निधन होईपर्यंत भारतीय क्रांतीची अनेक रूपे विकसित केली. ९ ऑगस्ट १९४२ ला भारतीय जनतेने ब्रिटिशांना भारत छोडोचा इशारा दिला. अगदी दुस-या दिवसापासून पूर्वाश्रमीच्या सातारा जिल्ह्यातील आणि आजच्या सांगली-सातारा जिल्दह्यातील जनतेने गांधीजींचा आदेश शिरोधार्य मानून ब्रिटिशांना खरोखरच त्या परिसरातून हद्दपार केले. या भारत छोडो आंदोलनाची सुरवात गांधीजींनी नेमून दिलेल्या नेमस्त पध्दतीनेच झाली. परंतु ब्रिटिशांनी ५ ठिकाणी गोळीबार करून ११ देशभक्तांचे मुडदे पाडले. पोलिसांची दडपशाही आणि जमीनदार गावगुंडांचे पाठबळ यांच्या जोरावर ब्रिटिश सत्तेने हे आंदोलन काही काळ चिरडून टाकले. तथापि भारताच्या मुक्तीचा एक नवाच आविष्कार समाजमनात घडत होता. आणि या आविष्काराचे नेते होते नाना पाटील!

एका बाजूला स्वातंत्र्यासाठी वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन उभे रहात असताना दुसरीकडे समुदायाचे बळ उभे करून ब्रिटिशांची सत्ता उलथवण्याचे प्रयोग जनता करत होती. त्यातला एक प्रयोग १९३० साली केला होता सोलापूरच्या गिरणीकामगारांनी. त्या गिरणीकामगारांनी काही दिवस सोलापूर हे शहर मुक्त केले होते. त्यासाठी मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुरबान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांच्या हौतात्म्याने सोलापूर कम्युन साकार झाले. सोलापूर कम्यून हा क्रांतिकारी कामगार चळवळीने बोल्शेविक क्रांतीला दिलेला प्रतिसाद होता. या कम्यूनने जगाला परिस कम्यूनची आठवण करून दिली होती.

एका शहरापुरते मर्यादित असलेल्या वा-याचे पुढे सातारा परिसरात वादळ झाले. ब्रिटिशांच्या दडपशाहीने थंडावलेल्या चळवळीत नाना पाटलांच्या रूपात एक स्फुल्लिंग धुमसत होता. ऑगस्ट १९४३ ते मे १९४६ या तीन वर्षांच्या काळात हा एक ग्रामीण कम्यूनच नाना पाटलांच्या चळवळीने उभा केला. त्याच कालखंडात अशाच प्रकारचे प्रयोग भारतीय जनता भागलपूर, बालिया, मिदनापूर, कोमिला, चंपारण आदि भागात करत होती. परंतु चहू बाजूंनी ब्रिटिशांनी वेढलेले असतानाही शेकडो गावांना मुक्त करून दाखवण्याचा चमत्कार करून दाखवला तो नाना पाटलांच्या नेतृत्वाखालील प्रति सरकारने. याची कारणमीमांसा करताना या परिसराच्या इतिहास भूगोलाचा धांडोळा घ्यावा लागेल. हा प्रदेश होता शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्त्वाचा, महात्मा फुल्यांच्या कटगुण व सावित्रीबाईंच्या नायगावचा. तसेच आगरकरांचे जन्मगाव असलेल्या टेंभूचाही. एका बाजूला शिवबाची स्वातंत्र्याची प्रेरणा व दुस-या बाजूला सत्यशोधकीय परंपरेचे जागरण यांच्या परिष्करणातून स्वातंत्र्य चळवळीने नवेच रसायन तयार केले. साम्राज्यवाद विरोध, सरंजामशाहीला मूठमाती, आणि जातीधर्माच्या पगड्यातून सर्व सामान्य स्त्रीशूद्रातिशूद्र जनतेला मुक्तीची उर्मी देणारी सामाजिक पार्श्वभूमी या परिसराने उभी केली होती. शूद्रातिशूद्रांना शिक्षण उपलब्ध करण्याची कामगिरीही कर्मवीर भाऊराव पाटलांनी याच भूमीत रुजविली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण काही काळ साता-यात झाले होते तर दुसरीकडे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनीही जातीनिर्मूलनासाठी बहुजनांची चळवळ याच परिसरात उभी केली होती. तरुणांना झपाटून टाकणा-या मार्क्सवादाची पताका खांद्यावर घेऊन कॉ. व्ही. डी. चितळे हाच परिसर पायाखाली तुडवत होते. या सर्व कार्याचा उत्कर्षबिंदू ठरले क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे क्रांतियुग. सारा समाज मुळापासून ढवळून टकणारी इतकी सर्वंकष क्रांती ही अपवादानेच आढळणारी गोष्ट! अशा प्रकारची उलथापालथ करणारी एक चळवळ युरोपात झाली होती. तिला प्रबोधन पर्व असे नाव आहे. विसाव्या शतकात कष्टकऱ्यांच्या निशाणाखाली नव्या शोषणविरहित समाजाची उभारणी करणारी ही नवी प्रबोधन क्रांती नाना पाटलांच्या प्रतिसरकारने आणि त्यांच्या भवतीच्या सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणाने घडवून आणली.

देशाला दीड शतकाहून अधिक काळ गुलामीत जखडून ठेवणा-या ब्रिटिश सत्तेचे देव या क्रांतीने शेकडो गावातून उठवून टाकले. ही लढाई लढण्यासाठी नानांना प्रेरणा मिळाली होती ती तुरुंगात अभ्यासलेल्या भगतसिंगाच्या ’राष्ट्रमुक्तीचा आराखडा’ या निबंधाची. भगतसिंगाचे शोषणमुक्तीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी एक नियोजनबध्द लढाई जिंकणे महत्वाचे होते. त्या लढाईच्या तंत्राची ओळख त्यांना हिटलरच्या फॅसिझम विरोधात निर्माण झालेल्या लढातंत्राने करून दिली. त्यासाठी त्यांनी धडे गिरवले ’ए. बी. सी. ऑफ सॅबोटाज’ या तुरूंगात वाचलेल्या पुस्तकातून. त्या पुस्तिकेनेच त्यांना गनिमी काव्याचे तंत्र शिकवले. ब्रिटिश सत्ता उलथायची तर तिच्या पाशवी दडपशाहीचे मर्म जोखणे आवश्यक होते. त्यासाठी ब्रिटिशांची यंत्रणा प्रमुख गावी असलेल्या पोलिसठाण्यांकरवी राबवली जायची. पोलिस ठाणे परिसरातला जमीनदार आणि त्यांनी पाळलेले गुंड ही दडपशाहीची यंत्रणा ब्रिटिश सत्तेचा आधार होती. या तीन मर्मांवर घणाघाती आघात केल्याने ब्रिटिश सत्ता लुळी पांगळी होऊन मोडून पडेल हे नाना पाटलांमधील कसलेल्या पैलवानाने ओळखले.

नाना पाटील आणि त्यांनी जमवलेल्या तरुणांच्या फौजेने लक्ष्य केले या पोलीसठाण्यांना. ठाण्यात पोलिसशिपायांची संख्या मोजकीच असायची. संख्येने त्यांना भारी पडतील अशा फौजेने गनिमी काव्याने ठाण्यांवर हल्ला करायचा, बेसावध शिपायांना जेरबंद करायचे आणि शस्त्रास्त्रे ताब्यात घ्यायची हे तंत्र त्यांनी अचूक वापरले. ब्रिटिश सत्तेला खिळखिळे करणारे दुसरे साधन म्हणजे सरकारी खजिन्यांची लूट. त्याकाळी महसुलाचा पैसा आणि नोकरांच्या पगाराची रक्कम रेल्वेतून पाठवली जात असे. उत्तरेला धुळ्यापासून ते कुंडलपर्यंत अशा अनेक खजिन्यांची लूट क्रांतिकारकांनी केली. स्टेशने जाळून ब्रिटिशांवर दहशत बसवली.

भागातील जमीनदार ब्रिटिशांचे हस्तक म्हणून काम करीत. हा परिसर तसा रयतवारी शेतक-यांचा. त्यामुळे तो कष्टकरी शेतकरी हाच प्रतिसरकारचा सैनिक बनला. त्यांच्या आघातांपुढे परिसरातील पाटील, देशमुख, देसाई, सरदेसाई आदि वतनदार नामोहरम झाले. सत्यशोधक चळवळीने भटभिक्षुकशाही विकलांग करून टाकलीच होती. त्यांच्या बरोबरीने सावकारांचा बंदोबस्त करण्याचे काम प्रतिसरकारच्या चळवळीने केले. गोरगरिबांची कर्जे फिटल्याचे जाहीरनामे प्रसृत करण्यात आले. १९३६ साली स्थापन झालेल्या किसान सभेने कर्जमुक्तीची आणि भूमीहीनांना, कसेल त्याला जमीन वाटपाची हाक दिली होती. त्याची अंमलबजावणी जोमदारपणे हे प्रतिसरकार करत होते. जमिनीसोबतच लुटलेला सरकारी खजिनाही गरिबांमध्ये वाटत होते. समाजसुधारणेची चळवळ इथे राजकीय क्रांतीच्या हातात हात घालून चालत होती. या स्वातंत्र्य चळवळीने अस्पृश्यता निवारण, आंतरजातीय विवाह आणि सहभोजने, विधवा विवाह, पुनर्विवाह आणि दारूबंदी, वेगवेगळ्या तुरुंगांमधील कैद्यांची मुक्तता हे कार्यक्रम तर राबवलेच पण विविध जलसे, कलापथके, अभ्यासशिबिरे या माध्यमांधून चळवळीचे एक सांस्कृतिक प्रभुत्व देखील प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ही खरी होती सर्वंकष क्रांती. अशाच क्रांतीचे स्वप्न लोकांच्या भाषेत प्रसृत केले जात होते. म. फुले, डॉ. आंबेडकर, मार्क्स, लेनिन यांच्या विचारांना तुकारामाच्या मराठीतून जनतेच्या मनामनात रुजवण्याचे काम चालू होते. त्याशिवाय का चावडीचावडीवर तिरंगा महिनोंमहिने डौलाने फडकत राहिला?

प्रतिसरकार ही नुसती कविकल्पना नव्हती वा अपघातही नव्हता. ती जनतेच्या ख-या राज्याची चुणूक होती. त्या राज्याची शास्त्रीय पायावर उभारणी करण्यात आली होती. गनिमी काव्याने लढणारी फौज, जनतेसाठी वापरायचा खजिना, कारभारी मंडळ, न्यायदान मंडळ, हेरगिरी करणारे बहिर्जी नाईक पथक, प्रसिध्दी मंडळ, प्रशिक्षण शाळा, जनसंपर्क यंत्रणा, तुफान सेना अशा अनेकानेक यंत्रणा या क्रांतीने उभ्या केल्या त्यासाठी गट उभारले. त्या गटात ५ पासून १५० पर्यंत कार्यकर्ते संघटित केले. गटांचे पथक, त्यांचे उपनायक, नायक, आणि शेवटी त्यांचे डिक्टेटर अशी शासनयंत्रणा त्यांनी उभी केली. शोषणाचा अंत करू पाहणारी शासनयंत्रणा कशी असू शकते त्याचा हा वस्तुपाठच होता.

हीच परंपरा स्वातंत्र्यानंतरदेखील नाना पाटलांनी चालू ठेवली. स्वातंत्र्यानंतर भांडवलदार जमीनदारांच्या सरकारचे समर्थन करणे ही १९४२ च्या प्रतिसरकारच्या चळवळीशी प्रतारणाच ठरली असती. तेलंगणच्या शेतक-यांच्या सशस्त्र लढ्याला शस्त्रास्त्रे पुरवून आपली समाजवादी क्रांतीशी असलेली नाळ तुटलेली नाही हे त्यांनी दाखवून दिले. त्याच परंपरेला जागत त्यांनी पुढे गोवा मुक्ती लढा आणि हैद्राबादच्या मुक्तीसंग्रामाला बळ दिले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला खंबीर नेतृत्व दिले. समाजवादी भारत घडवण्याच्या प्रेरणेने त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला, १९५५ च्या डहाणू परिषदेत अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्षपद भूषविले. त्यांची लोकप्रियता इतकी अफाट होती की १९५७ मध्ये साता-यातून, तर १९६७ मध्ये बीडमधून ते लोकसभेवर कम्युनिस्ट पक्षाचे खासदार म्हणून निवडून गेले. त्यांच्या लढ्याने क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, बर्डे मास्तर, शेखकाका, हुतात्मा बाबूजी पाटणकर, डी.जी. देशपांडे, शांताराम गरूड यांच्यासारखी अनेक स्वातंत्र्यरत्ने समाजाला दिली. त्यांची शोषणावर मात करण्याची परंपरा अलिकडच्या काळात कुंडल परिसरात जी. डी. बापू लाड, आणि वाळवा परिसरात नागनाथअण्णा नायकवाडी यांनी दीर्घकाळ जोपासली. त्यांनी स्थापन केलेले साखर कारखाने साखरसम्राटांचे अड्डे बनले नाहीत ते केवळ प्रतिसरकारने त्यांच्यावर केलेले संस्कार जागते ठेवल्यानेच. त्यांचे वारसदार अतिशय कठीण प्रसंगी आणि प्रतिगामी राजवटीत देखील शेतकरी केंद्रित, कल्याणकारी व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

नाना पाटील आणि त्यांचे प्रतिसरकार हे महाराष्ट्राला पडलेले समाजवादी रांगडे स्वप्न होते. आपल्या समाजवादाची वाटचाल त्यांनी मळलेल्या पायवाटेनेच होणार आहे.

प्रा. माया पंडित,
माजी प्र-कुलगुरू, ईफेल युनिव्हर्सिटी, हैदराबाद.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय