Sunday, May 19, 2024
HomeNewsचिंचवड विधानसभा-उमेदवार जगताप कुटुंबियांमधून असेल-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

चिंचवड विधानसभा-उमेदवार जगताप कुटुंबियांमधून असेल-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आम्ही अजून दुःखातून सावरलो नाही-शंकर जगताप

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:
चिंचवड विधानसभेचा उमेदवार जगताप कुटुंबातील असेल.उमेदवार ठरवण्यासाठी भाजपची प्रक्रिया ठरलेली आहे. इच्छुकांची नावं प्रदेशाकडे जातात.प्रदेशाची एक कोअर कमिटी आहे.नंतर ही नावं केंद्रीय संसदीय बोर्डाकडे जातात. त्यानंतर दिल्लीतून निर्णय घोषित होतो. आजची बैठक उमेदवार ठरवण्यासाठी नव्हती.निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत.मात्र निवडणूक झाल्यास स्थानिक बूथ समित्या अधिक सक्षम करण्यात येतील त्याची जबाबदारी संघटन सचिव अमोल थोरात यांचेकडे देण्यात आली आहे.असे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी पिंपरी येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मित्र पक्षांची कासारवाडी येथील हॉटेल कलासागरमध्ये पूर्वतयारी आढावा बैठक झाली. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीबाबत माहिती दिली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे,आमदार उमा खापरे,भाजपचे राज्य सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, रिपब्लिकन पार्टीच्या (आठवले गट) नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप,भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्यासह भाजपचे व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आम्ही दुःखात आहोत,राजकीय चर्चा नाही-शंकर जगताप


आम्ही पक्षनिष्ठ आहोत.स्वर्गीय बंधू लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कोणतीही राजकीय चर्चा आमच्या कुटुंबात झालेली नाही.आम्ही पक्षाच्या पाठीमागे आहोत.आम्ही सध्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जात नाही.असे शंकर जगताप यांनी पिंपरी पत्रकार परिषदेत सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय