मांजरी बु : मांजरी बु येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी दिली.
शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात ऑनलाईन माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्यावर सुप्रसिद्ध शिवव्याख्याते तेजस डोळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या युवकांनी शिवविचारांवर आधारित आपल्या जीवनाची वाटचाल करून आपल्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त करावे असे मत व्याख्याते तेजस डोळे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी शिवराज्याभिषेकाचे महत्त्व, शिवाजी महाराजांचे कार्य, महाराष्ट्रातील गडकिल्ले व शिवकाळातील विविध प्रेरक प्रसंग यावर मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिवराज्याभिषेक सोहळा व शिवरायांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.केतन डुंबरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.