मुंबई(२१मे): ७५ वर्षांपूर्वी, ७ जानेवारी १९४५ रोजी ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथे झालेल्या पहिल्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य किसान सभेची स्थापना झाली. तलासरीचे माह्या धांगडा व इतर १४ आदिवासी प्रतिनिधींनी, जमीनदार-सावकारांनी त्यांच्यावर वर्षांनुवर्षे लादलेली वेठबिगारी, लग्नगडी पद्धत, बेसुमार लूट व अनन्वित अत्याचारांची संतापजनक परिस्थिती या अधिवेशनात मांडली.
२३ मे १९४५ रोजी तलासरी तालुक्यात झरी या गावी डहाणू व तलासरी तालुक्यांतील ५,००० आदिवासी स्त्री-पुरुष जमले. कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली ही सभा बोलावली गेली. कॉ. शामराव परुळेकर आणि कॉ. गोदावरी परुळेकर यांनी वेठबिगारी व लग्नगडी पद्धत नष्ट करण्याची हाक दिली. आणि देशभर गाजलेल्या अभूतपूर्व वारली आदिवासी उठावाची सुरुवात झाली.
लाल बावट्याखाली झालेल्या आदिवासींच्या बुलंद एकजुटीतून, त्यागातून आणि संघर्षातून रानटी वेठबिगारी आणि लग्नगडी पद्धत काही महिन्यातच नष्ट करण्यात आली. मजुरीवाढीच्या व वनाधिकाराच्या, जमिनीच्या, पाण्याच्या, अन्नाच्या, रोजगाराच्या, शिक्षणाच्या व आरोग्याच्या हक्काच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना आदिवासी उठावाने पुढे यशस्वीरीत्या हात घातला.
पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू पासून जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, पालघर व ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यांपर्यंत, आणि नंतर नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, नांदेड, यवतमाळ व इतर आदिवासीबहुल जिल्ह्यांपर्यंत लाल बावट्याची तेजस्वी चळवळ पसरली आणि वाढत गेली.
जेठ्या गांगड पासून ते लक्ष्या बीज, बाबू खरपडे, मथी ओझरे व प्रदीप धोदडेपर्यंत ठाणे-पालघर जिल्ह्यातील ६१ आदिवासी हुतात्म्यांना ब्रिटिश, काँग्रेस आणि भाजप सरकारांच्या पोलिसांच्या व गुंडांच्या पाशवी दडपशाहीमुळे वीरमरण आले. नाशिक जिल्ह्यातील लक्ष्मण बागुल याच्यासह ३ हुतात्मे धारातीर्थी पडले.
या ऐतिहासिक वारली आदिवासी उठावाचा अमृत महोत्सव २३ मे २०२० रोजी साजरा केला जाणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने २३ मे रोजी दिवस अधिकाधिक गावांतील प्रत्येक घरावर लाल झेंडा उभारून साजरा करावा, असे आवहान केले आहे.