Friday, May 17, 2024
Homeराजकारणअजित पवारांचा सेलिब्रिटींंना संतप्त सवाल, वाचा काय म्हणाले...!

अजित पवारांचा सेलिब्रिटींंना संतप्त सवाल, वाचा काय म्हणाले…!

पुणे : शेेतकरी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. राष्ट्रीय पातळीवरील आंदोलनाचे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटू लागले आहेत.पॉपस्टार सिंगर रिहानाने याबद्दल ट्विट केलं होतं. त्यांनंतर आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग ने ट्विट करत आंदोलनाला जाहिर पाठिंबा व्यक्त केला होता. त्यावरून भारतातील कला आणि क्रीडा क्षेत्रासह अनेक नामवंतांनी ट्विट करून भूमिका मांडली होती. ट्विट करणाऱ्या सेलिब्रिंटींना अजित पवारांनी सवाल करत संताप व्यक्त केला आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी शेतकरी आंदोलनाबद्दल भाष्य केलं. यावेळी केंद्र सरकारच्या भूमिकेवरही पवारांनी टीकास्त्र डागलं. अजित पवार म्हणाले, “देशाच्या इतिहासामध्ये शेतकरी अहिंसेच्या माध्यमातून आंदोलन करू पाहत आहेत आणि तुम्ही उलट खिळे मारताहेत. मारले की नाही, ही काय पद्धत झाली का? त्यातच अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडतात. ते समजू शकतो. कधी कधी पाण्याचे फवारे मारतात. बॅरिकेट्स लावता. सुरक्षा लावता, हेही आम्ही समजू शकतो. पण, तीन चार महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. बारा तेरा बैठका होऊन चर्चा निष्पळ होते. चर्चा करून विषय संपवायला काय होतं? याचा अर्थ पुढे मागे सरकण्याची तुमची (केंद्र सरकार) मानसिकताच नाही. घेतलेला निर्णय, असा अट्टाहास आहे. हा निर्णय शेतकऱ्यांना पटत नसेल, तर लाखांचा पोशिंदा मागणी करेलच,” असं अजित पवार म्हणाले.

यावेळी सेलिब्रेटींच्या ट्विटबद्दल अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, “सेलिब्रेटींना माझी विनंती आहे, दोन-तीन महिने झालेत शेतकरी तिथे बसलेले आहेत. त्यावेळी का नाही काही मत व्यक्त केलं. कुणी थांबवलेलं होतं. आता बाहेरच्या कुठल्या सेलिब्रेटीला वाटलं की, इथं भारतातल्या शेतकऱ्यांबद्दल लक्ष दिलं गेलं पाहिजे. ते त्यांचं मत आहे. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ते मत व्यक्त केल्यावर इथं कुणाकुणाला जाग यायला लागली. इथं कुणी थांबवलं होतं का? आज शेतकरी तिथे थंडी वाऱ्यात बसलेला आहे, हे दिसलं नाही. आपल्या नंदूरबारच्या भगिनीचा मृत्यू झाला. इतकी थंडी असताना तिथं कुणी गेलं नाही. लोकशाहीत चर्चा करायची असते. चर्चेतून मार्ग काढायचा असतो. पण ते काहीच त्यांनी केलं नाही. एक ट्विट झाल्यानंतर सेलिब्रेटींनी काय ट्विट केलं हेही आपण पाहिलं,” अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय