Friday, May 17, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा

मोठी बातमी : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आज (५ एप्रिल) राजीनामा  दिला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांंनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 

अनिल देशमुख यांच्या राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले. त्यामुळे अनिल देशमुख यांनी स्वतः हुन राजीनामा दिला आहे. ते लवकरच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहे’, असं नवाब मलिक यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, त्याआधी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात पोहोचले आहे. त्याआधी शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि शरद पवारांची बैठक झाली. या बैठकीला सुप्रिया सुळे या सुद्धा हजर होत्या.

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतांना असे म्हटले होते की , मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी. 

या खटल्याची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलिस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. अशा वेळी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात येते आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याविषयी माहिती देताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं, “परमवीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख शरद पवारांना भेटले. सीबीआय चौकशी करणार असेल तर मी राजीनामा देऊ इच्छितो असं अनिल देशमुखांनी पवारांना सांगितलं. त्याला पवारांनी होकार दिला. त्यामुळे आता देशमुख राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात गेले आहेत.”

परमबीर सिंह यांच्या आरोपात कोणतंही तथ्य नाही, असंही मलिक यांनी म्हटलं. गृहमंत्री पदाची जबाबदारी सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पत्रात अनिल देशमुख म्हणतात की, अॅड . जयश्री पाटील यांचेद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक ०५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय. मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्यानुषंगाने मी, मंत्री ( गृह ) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत : हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. तरी मला मंत्री ( गृह ) या पदावरुन कार्यमुक्त करावे, अशी विनंती केली आहे.

शरद पवारांनी संवेदनशीलतेने हा निर्णय घेतला – चंद्रकांत पाटील

सीबीआय चौकशी सुरू असताना पदावर राहता येत नाही या संकेताचा विचार करून शरद पवारांनी संवेदनशीलतेने हा निर्णय घेतला असल्याबद्दल समाधान व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर व्यक्त केली.

सीबीआयच्या पंधरा दिवसांच्या चौकशीनंतर सगळं सत्य बाहेर पडेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय