Monday, November 25, 2024
Homeविशेष लेखपारधी समाजातील अनिष्ट प्रथा तोडण्यास सुरुवात - संतोष भोसले

पारधी समाजातील अनिष्ट प्रथा तोडण्यास सुरुवात – संतोष भोसले

मी संतोष भोसले रा. लोणी व्यंकनाथ, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असून माझे  बीएससी ऍग्री पर्यंत शिक्षण पूर्ण झाले. असून मी हि आदिवासी पारधी समाजातील एक तरुण युवक आहे. आणि ग्रामीण विकास केंद्र या सामाजिक संस्थेतचा तालुका समन्वयक म्हणून काम पाहत असून लोकअधिकार आंदोलन या संघटनेचा जिल्हा समन्वयक या पदावर कार्यरत आहे.

पारधी समाज म्हणलं की, डोळ्यासमोर विविध वाईट आणि आघोरी प्रथा आपणास प्रामुख्याने दिसतात, याचा त्रास सर्वात जास्त महिलांना सहन करावा लागतो. अनेक वेळा या अघोरी प्रथामुळे महिलांना सार्वजनिक ठिकाणी अपमान सहन करावा लागतो.

ज्या ठिकाणी एखादी महिला आंघोळ करते त्या ठिकाणी आंघोळ करायची नाही, बनवलेले जेवण स्वतः चा नवरा व वडिलांनीच खायचे, इतरांनी खायचे नाही. कोठे कोठे तर मुलीच्या हातची भाकर स्वतःचे वडील सुद्धा खात नाहीत, एखाद्या वस्तूला व अन्नाला   महिलेने हात लावला तर ती वस्तू पुरुषाने खायची नाही.

अगदी महिलेने वापरलेला कंगवा पुरुषाने वापरायचा नाही आणि महत्वाचे म्हणजे ज्या मातेने जन्म दिला. त्या मातेचा आशीर्वाद घेताना पदस्पर्श करायचा नाही, एखादी महिला ज्या अंथरूणावर बसते. त्यावर पती व्यतिरिक्त कोणी बसत नाही, महिलेने आंघोळ व स्वतःचे कपडे धुतल्यानंतर घराच्या पूर्व दिशेला घरापासून दूर पहिल्यांदा हात ध्वायचे व घरातील कोणत्या वस्तूला हात न लावता हात धुतल्यावरच घरात प्रवेश करायचा. सर्वात वाईट म्हणजे महिलेच्या डिलिव्हरीच्या वेळ व डिलेवरी झाल्यावर पाच दिवस कोणीही स्पर्श करायचा नाही, आणि स्वतःची व बाळाची काळजी तिनेच पाच दिवस घ्यायची.

अशा वाईट प्रथा आमच्या समाजात आज प्रामुख्याने आपणास दिसत आहेत. अशा प्रथांमुळे व शुद्धीकरणाच्या आघोरी परंपरांमुळे आजची पारधी समाजातील महिला फार संकटातून प्रवास करत आहे. कधीकधी तर अशा अघोरी प्रथांमुळे महिलांना जीवही गमवावा लागतो. या प्रकारामुळे प्रथांमुळे त्यांना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागतो, हे मला अजिबात मान्य नसून आज आसाराम काळे यांच्या मुलाच्या लग्नात परिवर्तनवादी समाजसेवक डॉ. ऍड.  अरुण जाधव यांच्या साक्षीने या प्रथा मोडण्‍यास लग्नात जेवण करून सुरुवात केली आहे.

कारण अॅड.डॅा.अरुण जाधव 30 वर्षांपासून फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. अॅड.अरुण जाधव यांना लहानपणापासून ओळखत आहे. त्यांचे अंधश्रद्धा विरुद्धचे काम उल्लेखनीय आहे. यातूनच मला पारधी समाजातील अंधश्रद्धा मोडून काढण्याची ताकद मिळाली कारण या प्रथांमुळे पारधी समाज एकत्र राहत नाही पूर्णपणे विखुरलेला आहे.

पारधी समाजातील बरेच कार्यकर्ते शाहू-फुले-आंबेडकर विचाराला धरून काम करतात. परंतु पारधी समाजातील कुठल्याही विधीमध्ये अन्न भोजन करत नाहीत आणि कोणत्याच सणात कार्यक्रमात अन्न भोजन करत नाहीत. तसेच शिवशिव मोठ्या प्रमाणात पाळतात आणि पारधी समाजातील या भयानक प्रथा व अंधश्रद्धा आणि परंपरा मोडण्याचे धाडस करत आहोत. भविष्यात हेच काम करणार आहोत याचं सर्व श्रेय डॉक्टर अरुण जाधव यांना जाते.

अरुण जाधव यांच्यासोबत पारधी समाजातील  लग्नात एक पारधी समाजाचा मुलगा जेवण करत आहे. आज पासून या प्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. कारण याच महिन्यात घडलेली उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा या गावातील  महिलेला आपले चारित्र्य शुद्ध करण्यासाठी उकळत्या तेलात हात घालावा लागला. स्वतःचा हात या प्रथांमुळे जाळून घ्यावा लागला. म्हणूनच अशा अघोरी प्रथा परंपरा मला अजिबात मान्य नाहीत, म्हणून या प्रथा-परंपरा मोडण्याचा संकल्प केला आहे.

– संतोष भोसले, जिल्हा समन्वयक

 – लोक अधिकार आंदोलन

संबंधित लेख

लोकप्रिय