देशभरातील प्रतिनिधींच्या एकजुटीने रिक्षा, टॅक्सी चालकांच्या प्रश्नांना न्याय देऊ – बाबा कांबळे
दिल्ली येथे भारतातील रिक्षा टॅक्सी चालकांची राष्ट्रीय परिषद उत्साहात
नवी दिल्ली : देशभरातील रिक्षा चालक, टॅक्सीचालकांचे प्रश्न एकच आहेत. त्यांच्या प्रश्नांना शासनस्तरावर न्याय दिला जात नाही. त्यासाठी देशभरातील संघटनांनी एकत्र येऊन संघर्षाला तयार झाले पाहिजे. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या एकजुटीने रिक्षा चालक, टॅक्सी चालकांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय देऊ, असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.
दिल्ली येथे देशभरातील रिक्षा टॅक्सी,ड्रायव्हर व वाहतूदार संघटनेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, नेते प्रतिनिधी यांची राष्ट्रीय परिषद दिल्ली येथील महात्मा गांधी स्मृती सभागृह, दर्शन स्मृती ट्रस्ट राजघाट येथे 12 सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडली. या परिषदेत राष्ट्रीय अध्यक्षपदी बाबा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी सत्काराला उत्तर देताना बाबा कांबळे बोलत होते. राजेंद्र सोनी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, जॉर्ज फर्नांडिस नंतर स्वर्गीय शरद राव यांनी देशभरामध्ये रिक्षा चालकांचे संघटन करण्याचे स्वप्न पाहिले. परंतु आकस्मित झालेल्या मृत्यूमुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. यांचे अपूर्ण स्वप्न आम्ही सर्व मिळून पूर्ण करू, असे बाबा कांबळे म्हणाले. मला देशाच्या राजधानी मध्ये अत्यंत महत्वाचे पद आपण दिले,प्रेम दिले आहे, त्याची परतफेड देशातील रिक्षा टॅक्सी संघटनांचे प्रश्न सोडवून करिल, सर्व संघटनांनी दिलेल्या जबाबदारी बद्धल मी ऋणी असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.
दिल्ली येथील रिक्षा टॅक्सी चालकांचे नेते राजेंद्र सोनी यांची राष्ट्रीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय सल्लागारपदी शब्बीर अहमद विद्रोही, व पी. रविशंकर, (हैदराबाद तेलंगणा) राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नरेंद्र गायकवाड (नांदेड) महासचिव आनंद भाऊ चवरे (नागपूर) व रुपेश सोनार (गुजरात), महाराष्ट्र अध्यक्षपदी गफार नदाफ (कराड), महाराष्ट्र सचिवपदी, नाना सातव (बारामती), उत्तर प्रदेश अध्यक्षपदी कल्लू भाई यादव (उत्तर प्रदेश), कर्नाटक अध्यक्षपदी गजानन खापे (कर्नाटक) यांची नियुक्ती करण्यात आली.
या वेळी, कासम मुलानी (नवी मुंबई) जावेदभाई देऊळकर (मुंबई)योगेश शर्मा (हरियाणा) जिशिपल जी (लुधियाना)मंसुरिजी (गुडगाव) राकेश वर्मा म्होमाड आरिफ (दिल्ली) सनी हमने (चंद्रपूर)तानाजी मासालकर, सिद्धाराम चोपडे (सोलापूर)बाळा जगदाळे (पनवेल) आशिष देशपांडे (अंबरनाथ ठाणे)आधी उपस्थित होते
दिल्ली येथील रिक्षा टॅक्सी चालकांचे नेते किशन वर्मा यांनी बाबा कांबळे यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतचा प्रस्ताव मांडला. त्याला राजेंद्र सोनी, नरेंद्र गायकवाड सह सर्व राज्यातील पदाधिकाऱ्यांनी अनुमोदन दिले. आणि बाबा कांबळे यांची बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या बरोबरच या परिषदेत १३ ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये ओला, CNG मध्ये होणारे स्वतःची दरवाढ यावर चिंता व्यक्त करत सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था व मेट्रोच्या धर्तीवर रिक्षाला मदत करावी अनुदान द्यावे, उबेरची बेकायदेशीर दुचाकी प्रवासावर बंदी आणून केंद्र आणि राज्य सरकारने टॅक्सीला प्रथम प्राधान्य द्यावे. रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी महामंडळाची स्थापना करण्यात यावी.
या मंडळामार्फत निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा, आजारपणात रुग्णालयातील खर्च, औषधांच्या खचांत संविधा. पाल्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूद असावी. औषधांच्या खर्चात सुविधा, पाल्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूद असावी. ईएसआय, पीएफची सुविधा द्यावी. इलेक्ट्रीक रिक्षासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी २५ असे एकूण ५० टक्के अनुदान मिळावे. रिक्षा, टॅक्सीचालकांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सारथी आयोगाची स्थापना करावी. अल्प दरात घरांची सुविधा मिळण्यासाठी आवास योजना राबविण्यात यावी. रिक्षा, टॅक्सी चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या प्रतिनिधीसह शासकीय समितीची स्थापना करावी. रिक्षा, टॅक्सीचालकांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी राज्यसभेत प्रतिनिधी नियुक्त करावेत. सीएनजीसाठी अनुदान द्यावेत. मेट्रो, बीआरटीप्रमाणे रिक्षा, टॅक्सीलाही सार्वजनिक सेवेचा दर्जा द्यावा. ऑनलाईन दंडस्वरूपात आकारण्यात येणारे चलन बंद करावे, आदीसह विविध ठराव संमत करण्यात आल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.
– क्रांतिकुमार कडुलकर
ऑटो रिक्षा, टॅक्सी संघटनेच्या राष्ट्रीय फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्षपदी बाबा कांबळे यांची नियुक्ती
संबंधित लेख