पुणे, दि.२२ : आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशी पुणे जिल्हा परिषद व आयसीडीएस विभागीय उप आयुक्त यांच्या कार्यालयांवर सुमारे २००० अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तीव्र निदर्शने केली. जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी व उप आयुक्त यांना निवेदनही देण्यात आले.
मोर्चाचे नेतृत्व शुभा शमीम, रजनी पिसाळ, आशाबी शेख, शैला भोसले, शुभांगी शेटे, वैशाली चव्हाण यांनी केले.
गेली साडेपाच वर्षे राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केलेली नाही. मानधनात भरीव वाढ करावी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन, मराठी भाषेत पोषण ट्रॅकर ॲप, नवीन चांगला मोबाईल आदी मागण्यांसाठी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आजपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर गेल्या आहेत.