पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चांना उधान आले होते. अशा परिस्थितीत अजित पवार हे भाजप बरोबर जाणार असल्याच्या चर्चा देखील चांगल्याच रंगल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या केलेल्या या ट्वीटमुळे राजकिय वर्तूळात खळबळ उडाली होती.
अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याचं ट्वीटवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे.” अशी प्रतिक्रिया एका वाक्यात दिली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याचा दावा केला होता. त्यांनी ट्वीट करत म्हटले होते कि, ‘आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.’ असं ट्वीट त्यांनी केल होतं.